महापालिका निवडणुकीत ‘विकास हवा की सुरक्षितता’ हा कळीचा मुद्दा ठरला होता. त्यावेळी महत्वपूर्ण ठरलेला हा मुद्दा लोकसभा निवडणुकीत पुन्हा उचल खातो की काय, याची धास्ती राष्ट्रवादी काँग्रेसला वाटत असल्याचे अधोरेखीत झाले आहे. शहरातील गुन्हेगारी वाढण्यास राष्ट्रवादी काँग्रेस कारणीभूत असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून नेहमीच केला जातो. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असताना नाशिकरोड भागात वाहनांच्या जाळपोळीचा प्रकार घडला. या पाश्र्वभूमीवर, राष्ट्रवादी काँग्रेसने तातडीने पोलीस आयुक्तांना निवेदन देऊन जाळपोळीच्या या घटना म्हणजे सत्ताधारी पक्षाला बदनाम करण्याचा डाव असल्याचे नमूद करत त्याचा निषेध केला आहे. विशेष म्हणजे, या घटनेप्रकरणी कोणत्याच विरोधी पक्षाने राष्ट्रवादीवर आरोप केलेले नसतानाही मते मिळविण्यासाठी विरोधकांकडून जाणीवपूर्वक जुना डाव खेळला जात असल्याची तक्रार राष्ट्रवादीने केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
काही वर्षांपूर्वी नाशिक हे गुन्हेगारांचे शहर म्हणून ओळखले जात होते. महिलांच्या अंगावरील दागिने खेचून नेणे, बाहेर गावाहून आलेल्या प्रवाशांना मारहाण करून लुटमार, गुंड टोळ्यांचा धुडगुस, वाहनांची तोडफोड व जाळपोळ असे अगणिक प्रकार शहरात राजरोसपणे घडत होते. गुन्हेगारीला लगाम घालण्यात तेव्हा पोलीस यंत्रणाही अपयशी ठरली. गुन्हेगारांवर तडिपारीची कारवाई केली तर राजाश्रय लाभलेली मंडळी मंत्रालयातून ती रद्द करून घेत होती. परिणामी, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत असतानाच कुलवंत कुमार सरंगल यांनी पोलीस आयुक्तपदाची सुत्रे स्वीकारली आणि मग परिस्थिती झपाटय़ाने बदलू लागली. गुन्हेगारांविरोधात धडक मोहीम सुरू करत सरंगल यांनी राजकीय मंडळींचा पोलीस ठाण्यातील वावरही कमी केला. दहशत पसरविणाऱ्या राजकीय गुन्हेगारांवर कारवाईचे अस्त्र उगारले. मागील दोन वर्षांत गुन्हेगारीच्या घटनांवर लागलेला लगाम हे पोलीस आयुक्तांच्या कामगिरीचे फलित आहे.
याच दरम्यान झालेल्या महापालिका निवडणुकीत विरोधी पक्षांनी शहरातील गुन्हेगारीला राष्ट्रवादीला जबाबदार धरले होते. गुन्हेगारी पाश्र्वभूमीच्या मंडळींकडून उभारल्या जाणाऱ्या शुभेच्छा किंवा नियुक्ती फलकांवर ‘प्रेरणास्थान’ आणि ‘मार्गदर्शक’ म्हणून राष्ट्रवादीच्या नेत्यांची छायाचित्रे झळकत असल्याचे आरोपही केले गेले. मनसे, भाजप व शिवसेना या पक्षांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर थेट आरोप केले होते. या आरोपांचा थेट परिणाम महापालिका निवडणुकीच्या निकालातही झाल्याचे दिसले. मागील निवडणुकीत घडलेल्या या घडामोडी लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सजग झाला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर, नाशिकरोड भागात वाहनांच्या जाळपोळीची घटना घडल्यानंतर कोणी काही आरोप करण्याआधीच आपला पक्ष निर्दोष असल्याचे स्वत:च सांगत विरोधकांवर शरसंधान साधण्याचा डाव राष्ट्रवादीने खेळला. या पक्षाचे खा. समीर भुजबळ यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना बदनाम करण्याठी हा डाव रचल्याचे म्हटले आहे. जाळपोळीच्या घटनेचा निषेध करून संशयितांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही राष्ट्रवादीने केली. मागील निवडणूक काळात काही गुंडांनी गुन्हेगारी घडामोडींमध्ये सुनियोजितपणे वाढ केली होती. निवडणूक जिंकण्यासाठी विरोधक हे सत्ताधारी पक्षाला बदनाम करण्यासाठी कायदा व सुव्यवस्थेला आव्हान देण्याची खेळी खेळतात. तसाच प्रकार अद्याप सुरू असल्याचे राष्ट्रवादीने म्हटले आहे. काँग्रेस आघाडी विकासाच्या मुद्यावर निवडणुकीला सामोरी जात आहे. परंतु, विरोधक विकासाच्या मुद्यावरून नागरिकांचे लक्ष दूर करण्यासाठी जुना डाव खेळत असल्याची तक्रारही खा. भुजबळ यांनी केली. महापालिका निवडणुकीत अडचणीचा ठरलेला मुद्दा लोकसभेत पुन्हा विरोधकांना आयते कोलीत देणारा ठरू नये, असा राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे.