माजी उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी माजी खासदार व भाजपाचे नेते डी. बी. पाटील यांची त्यांच्या निवासस्थानी शुक्रवारी सकाळी भेट घेतली. या वेळी दोघांची बंद खोलीत सुमारे २० मिनिटे चर्चा झाल्याने आणखी एक मोहरा राष्ट्रवादीच्या गळाला लागण्याची दाट शक्यता व्यक्त होत आहे.
नांदेड-वाघाळा महापालिका निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ अजित पवार, प्रदेशाध्यक्ष मधुकरराव पिचड दोन दिवसांच्या नांदेड दौऱ्यावर आले होते. पवार यांनी नांदेड व सिडको भागातील जाहीर सभांना हजेरी लावल्यानंतर हॉटेल चंद्रलोक येथे मुक्काम केला. रात्री उशिरा चिखलीकर व पवार यांच्यात चर्चा झाल्यानंतर माजी खासदार पाटील यांच्या निवासस्थानास भेट देण्याचे ठरले. त्यानुसार चिखलीकरांनी पाटील यांना दादा घरी येत असल्याचा निरोप दिला.
शुक्रवारी सकाळी ११ वाजता अजितदादांचे आनंदनगर येथील पाटील यांच्या निवासस्थानी आगमन झाले. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष पिचड, माजी मंत्री कमलकिशोर कदम, आमदार विनायक मेटे व विक्रम काळे, राष्ट्रवादीचे प्रवक्ते आमदार सतीश चव्हाण, माजी आमदार प्रताप पाटील चिखलीकर, भाजपा नेते भगवानराव आलेगावकर, हरिहरराव भोसीकर, चंद्रकांत पाटील यांची या वेळी उपस्थिती होती. पाटील यांचे ज्येष्ठ चिरंजीव सत्यानंद पाटील यांनी काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली. या घटनेबद्दल नेत्यांनी पाटील यांचे सांत्वन केले.
पवार यांनी पाटील यांची आस्थेवाईकपणे विचारपूस केली. चहापानानंतर चिखलीकरांनी पवार यांना बंद खोलीत नेले. या वेळी खोलीत पाटील, भगवानराव आलेगावकर, कमलकिशोर कदम यांच्यात तब्बल २० मिनिटे चर्चा झाली. चर्चेनंतर पवार परभणीकडे निघून गेले.
पवार यांच्या पुढाकारातून प्रताप चिखलीकर राष्ट्रवादीत दाखल झाल्यानंतर त्यांनी आणखी काही नेत्यांना राष्ट्रवादीत आणण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्याचाच भाग म्हणून अजित पवार-डी. बी. पाटील भेट घडवून आणल्याचे मानले जाते. राजकीय वर्तुळात या भेटीला मोठे महत्त्व प्राप्त झाले असून, चिखलीकरानंतर एक ‘मोहरा’ राष्ट्रवादीच्या गळाला लागण्याची दाट शक्यता निर्माण झाल्याचे राजकीय जाणकारांत बोलले जात आहे.