विद्यार्थ्यांच्या ‘शाळा सोडल्याच्या दाखल्यां’मध्ये ‘राष्ट्रीयत्व’, ‘जात’, ‘जन्मतारीख’ अशा काही महत्त्वाच्या बाबींचा उल्लेख करण्याचे काही शाळा विसरत असल्याने प्रवेशाच्या तोंडावरच विविध सरकारी कार्यालयांच्या चकरा मारून पालक हैराण होत आहेत. मुळात या प्रकारच्या चुका दाखल्यावर असतील तर त्यात दुरुस्ती कुणी करायची, याबाबत स्पष्टता नाही. त्यामुळे, दाद कुठे मागायची असा प्रश्न पालकांना पडतो.
मुंबईत अशा अनेक शाळा आहेत की ज्या या दाखल्यावरील या नोंदीबाबतचे नियम पाळत नाहीत. कुणाचे नावच चुकवायचे तर कुणाची जात. पश्चिम उपनगरातील मालाड, गोरेगाव, कांदिवली भागातील काही निवडक शाळांमध्ये तर राष्ट्रीयत्वाच उल्लेख केला जात नाही, अशी पालकांची सार्वत्रिक तक्रार आहे. गोरेगावमधील एका शाळेच्या निष्काळजीपणामुळे नुकतेच एका पालकांना मोठय़ा त्रासाला तोंड द्यावे लागले. या मुलाच्या दाखल्यावर शाळेने राष्ट्रीयत्वाचा उल्लेखच केला नव्हता. या मुलाचा अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठीच्या प्रवेशाचा अर्ज नाकारण्यात आला. पालकांनी शाळेशी संपर्क साधून दाखल्यात दुरुस्ती करण्याची विनंती केली. मात्र, त्यांना शाळेने दाद दिली नाही. गेला महिनाभर शाळा आणि शिक्षण विभागाच्या विविध कार्यालयांच्या चकरा मारून हे पालक हैराण झाले होते. आम्ही पश्चिम विभागाच्या शिक्षण निरीक्षक कार्यालयाशी संपर्क साधून आमची अडचण येथील अधिकाऱ्यांच्या कानावर घातली. त्यांनी या शाळेला कडक शब्दांत सूचना दिल्यानंतर कुठे आम्हाला शाळेने सुधारित दाखला दिला, अशी माहिती श्रीयुत पवार या पालकांनी दिली.

दुरुस्तीकरिता ‘कॅम्प’
या प्रकारच्या तक्रारींची प्रकरणे प्रवेशाच्या तोंडावर दरवर्षी शिक्षण निरीक्षक कार्यालयात जमा होऊ लागतात. उत्तर विभागाचे शिक्षण निरीक्षक अनिल साबळे यांनी तोडगा काढला असून शाळांनी दाखल्यामधील नोंदीत दुरुस्तीकरिता पालकांचे ‘कॅम्प’ घ्यावे, अशी सूचना केली आहे. शाळेत प्रवेश घेताना केलेल्या नोंेदीच्या आधारावरच शाळा सोडल्याच्या दाखल्यावर नोंदी केल्या जातात. त्यामुळे, त्यात काही चूक झाली की त्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावरही तशाच येतात. त्यामुळे, प्रवेश घेतेवेळेसच पालकांनी योग्य नोंदी केल्याची खात्री करावी. तसेच, या कॅम्पच्या माध्यमातून शाळांनी पालकांना बोलावून आपल्याकडील नोंदी दाखवाव्यात. त्यात काही दुरुस्ती असल्यास त्याच वेळेस पालकांकडून योग्य प्रक्रिया पूर्ण करवून घेऊन त्यानुसार बदल करावा, असे शाळांना कळविल्याचे साबळे यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

‘ष’चा ‘स’..
अनेकदा पालकांच्या उच्चारांमुळेही दाखल्यात चुका होतात. उदाहरणार्थ उत्तर किंवा दक्षिण भारतातून मुंबईत स्थलांतरित होणाऱ्या पालकांच्या बाबत ही समस्या उद्भवते. उत्तर भारतीय ‘ष’चा उच्चार ‘स’ असा करतात. त्यामुळे, ‘संतोष’चा ‘संतोस’, ‘आकाश’चा ‘आकास’ अशा काही गमतीजमती दाखल्यावर होतात.

शाळा सोडल्याच्या दाखल्यावर मुलाचे नाव, आईवडिलांचे नाव, जन्मतारीख, जात, राष्ट्रीयत्व, शाळा सोडल्याचे कारण अशा काही महत्त्वाच्या बाबींचा उल्लेख असलाच पाहिजे. त्यामुळे या नोंदी व्यवस्थित आहेत की नाहीत याची खातरजमा पालकांनी करून घ्यायला हवी.
अनिल बोरनारे, विभाग अध्यक्ष, अनिल बोरनारे