नैसर्गिक संकटांना तोंड देत वाटचाल करणाऱ्या शेतक ऱ्यांनी नागरिकांचे आरोग्य उत्तम राहावे म्हणून आणखी एक पाऊल उचलले आहे. शासन किंवा कोणत्याही संस्थेच्या मदतीविनाच शेतक ऱ्यांच्या गटाने नैसर्गिक शेतमाल विक्री केंद्र शहरात नुकतेच सुरू केले. रसायनमुक्त सेंद्रीय शेतमालाची विक्री करणारे विदर्भातील हे पहिलेच केंद्र आहे. विशेष म्हणजे, या उत्पादनात महाराष्ट्र देशात तिसऱ्या क्रमांकावर आहे.
आज धावपळीच्या जीवनात सर्वत्र प्रदूषित वातावरण निर्माण झाले असून त्याचा थेट परिणाम आरोग्यावर होत आहे. उत्तम आरोग्यासाठी सकस आहाराची अत्यंत आवश्यकता आहे. आहारात जीवनसत्त्वे, प्रथिने, खनिजे, कबरेदके यांचा योग्य प्रमाणात समावेश असायलाच हवा. धान्य, भाजीपाला, फळे, दूध हे आहाराचे अविभाज्य भाग आहेत, पण रासायनिक खते आणि कीटकनाशकांच्या अतिवापराने अन्नधान्य आणि भाजीपाल्यांमध्ये विषारी घटकांचे प्रमाण आढळून आले आहे. ते पोटात गेल्याने आजारांच्या विळख्यात सापडण्याची शक्यता बळावल्यामुळे विषमुक्त धान्य, भाजीपाला, फळे, औषधी वनस्पती, दूध आदी खाद्यपदार्थाच्या वापराकडे ग्राहकांचा कल वाढू लागला आहे. ही मागणी लक्षात घेऊनच नैसर्गिक (सेंद्रीय) शेतमाल उत्पादक संस्थेने रामदासपेठेतील लेन्ड्रा पार्कमध्ये ‘शेतकरी ते ग्राहक थेट विक्री केंद्र’ सुरू केले आहे. ही संस्था दरवर्षी जानेवारीत तांदूळ महोत्सव व मार्च-एप्रिलमध्ये गहू महोत्सव आयोजित करते. वर्षांतून ठराविक वेळीच होणाऱ्या महोत्सवामुळे अनेक ग्राहकांना नैसर्गिक शेतमाल मिळत नाही. त्यांना वर्षभर या शेतमालाचा पुरवठा व्हावा, या हेतूनेच हे केंद्र आकाराला आले आहे.
भारतीय पारंपरिक नैसर्गिक शेती तंत्रज्ञानाने उत्पादित मूळ नैसर्गिक गुणांनी समृद्ध व आरोग्यवर्धक सेंद्रीय शेतमाल या केंद्रात उपलब्ध आहे. यात सर्व प्रकारचा मोसमी भाजीपाला, संत्री, मोसंबी, लिंबू व इतर फळे, चिन्नोर, जय श्रीराम व हातकुटीचा तांदूळ, बन्सी, लोकवन गहू व पीठ, गावरान ज्वारी व पीठ, गावरान तुरीची डाळ, हरभरा डाळ व बेसन, धने, जिरे, हळद व तिखट, वायगाव हळद, भिवापुरी मिरची आदी मसाल्याचे पदार्थ, गूळ, शेंगदाणे, शेंगदाणे तेल, लोणची, अंबाडी शरबत, जवस, जवस चटणी, गृहस्वच्छतेसाठी गोमूत्रापासून तयार केलेले मिश्रण व इतर पदार्थ उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे, या केंद्रातील सर्वच वस्तू मॉलच्या तुलनेत स्वस्त आहे.
‘नॅशनल प्रोग्राम फॉर ऑरगॅनिक प्रॉडक्शन’अंतर्गत काम करीत असलेल्या नैसर्गिक (सेंद्रीय) शेतमाल उत्पादक संस्थेचे विदर्भात प्रामुख्याने नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, यवतमाळ, अकोला, अमरावती या जिल्ह्य़ांमध्ये अडीचशे शेतकरी सभासद आहेत. हे सर्व ऑरगॅनिक फार्मिग ब्युरोकडून प्रमाणित आहेत.
गेल्या काही वर्षांत रासायानिक शेतीचे दुष्परिणाम बघता नैसर्गिक शेती करणाऱ्यांची संख्या राज्यात एक लाखावर पोहोचली आहे. सेंद्रीय कृषी उत्पादनांमध्ये ऊस, कापूस, तांदूळ, मसाले, डाळी, चहा, कॉफी, तेलबिया व संत्रा, मोसंबीसह विविध फळांचा समावेश आहे.
शासनाने जागा द्यावी -ठवकर
शेतकऱ्यांच्या सामूहिक प्रयत्नातूनच हे केंद्र साकारले आहे. अ दर्जाची संत्री आणि विषमुक्त धान्य, भाज्या व फळे येथे आहेत. रामदासपेठेत रुग्णालये मोठय़ा संख्येने आहेत. तेथील रुग्णांना आरोग्य पेय (हेल्थ ड्रिंक्स) आणि फळे त्याचप्रमाणे ग्राहकांना शेतमाल घरपोच देण्याची आमची योजना आहे. शहरातील महत्त्वाच्या चार-पाच ठिकाणी अशी केंद्रे सुरू करण्याचा सभासद शेतक ऱ्यांचा विचार आहे. शासनाची मदत न घेताच सुरू केलेले विदर्भातील हे पहिलेच ‘शेतकरी ते ग्राहक थेट विक्री केंद्र’आहे. अशा उपक्रमाला चालना मिळण्यासाठी शासनाने जागा उपलब्ध करून द्यावी, अशी अपेक्षा आहे.
अंबरीश ठवकर, केंद्र संचालक
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 17, 2015 7:14 am