विद्यार्थ्यांना वन्यप्राणी संरक्षणाविषयी माहिती मिळावी तसेच निसर्गाची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने १७ ते २० एप्रिलदरम्यान मेळघाट व्याघ्र प्रकल्पानजिकच्या निसर्ग संरक्षण संस्थेच्या मुठवा निसर्ग संसाधन केंद्रावर विदर्भस्तरीय निसर्ग अभ्यास शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात नागपूर, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ व अमरावती जिल्ह्यातून इयत्ता सातवी ते बारावीचे विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन निसर्ग रक्षणाचे धडे घेतले. आमदार डॉ. सुनील देशमुख यांच्या उपस्थितीत शिबिराचा समारोप झाला.
जगातील प्रगत देश आता पुन्हा निसर्ग संरक्षणाकडे वळत आहेत. त्यामुळे प्रत्येकाने येथून गेल्यावर आपल्या घराजवळ निदान पाच झाडे लावावेत, असा संदेश डॉ. सुनील देशमुख यांनी शिबिरार्थीना दिला. यावेळी महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य किशोर रिठे, मोगरदा सर्कलचे जिल्हा परिषद सदस्य सदाशिव खडके, जांबू ग्रामपंचायतचे उपसरपंच कृष्णा गायन उपस्थित होते.
शिबिरादरम्यान विद्यार्थ्यांनी सेंद्रीय शेती व्यवस्थापन व वन्यजीव, जैविक विविधता व तिचे संरक्षण, निसर्ग पर्यटन व वनसंरक्षणातून उद्योग, वनसंरक्षणातून जलसंधारण व ऊर्जा विकास अशा अत्यंत महत्त्वपूर्ण विषयांबाबत विविध अध्यापन पद्धतीचा वापर करून शिक्षण घेतले. यावेळी विद्यार्थ्यांनी प्रशिक्षकांसमवेत निसर्ग संरक्षण संस्थेच्या आदर्श अशा मुठवा केंद्र, नजिकच्या आदिवासी गावांमध्ये तसेच मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये फिरून धडे घेतले.
विद्यार्थ्यांना या प्रशिक्षणामध्ये संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील प्राणीशास्त्र विभागाचे सेवानिवृत्त विभागप्रमुख डॉ. जी.एन. वानखेडे यांनी मानव- वन्यजीव संघर्ष टाळण्याकरिता प्रयोगशाळेचे महत्त्व, संघर्षांमागील कारण आणि प्रयोगशाळेत निष्कर्ष कसे काढावे, याविषयी मार्गदर्शन केले. भारतातील जंगलाच्या संरक्षण व संवर्धनाबाबतची चर्चा किशोर रिठे यांनी विद्यार्थ्यांशी केली. प्रा. निशिकांत काळे यांनी वातावरण बदलाविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. निसर्ग शिक्षक म्हणून ओळखले जाणारे प्रा. प्रकाश लढ्ढा यांनी विद्यार्थ्यांना नैसर्गिक संसाधनांचा योग्यप्रकारे वापर कसा करावा, याविषयी मार्गदर्शन केले. व्याघ्र प्रकल्पाचे महत्त्व विद्यार्थ्यांना कुणाल पोटोडे यांनी सांगितले.
राहुल काळमेघ व सम्राट पेठे यांनी विद्यार्थ्यांना पक्षीनिरीक्षण, रानवाचन, वन्यजीवदर्शन, स्लाईड शो, वन्यजीव संवर्धनावर चित्रपट आदी अनेक उपक्रमांचा समावेश करून
निसर्गाशी जवळीक निर्माण करून दिली. अभ्यासक्रमाच्या अखेरच्या सत्रात विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले. वर्ग सातवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांमध्ये प्रशिक्षणाअखेर झालेला बदल यावेळी जाणवला.