अखिल भारतीय मराठी नाटय़परिषदे’चे यंदाचे नाटय़संमेलन बेळगावमध्ये घेण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. मात्र, सध्या बेळगावसह १२ शहरांच्या नामांतरावरून तिथे सुरू असलेल्या संघर्षांच्या पाश्र्वभूमीवर नाटय़संमेलन निर्विघ्नपणे पार पडावे, यासाठी हरएक प्रयत्न सुरू असल्याची माहिती नाटय़परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांनी दिली. नाटय़संमेलनाच्या निमित्ताने बेळगावमध्ये नाटकाच्या बसेसवर लागणारा कर माफ करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असून मराठी नाटक तिथे पोहोचलेच पाहिजे, असा निर्धार परिषदेने केला आहे.
९५ व्या नाटय़संमेलनाच्या नियोजित अध्यक्ष अभिनेत्री फैय्याज यांचा नाटय़परिषदेच्या वतीने मंगळवारी सत्कार करण्यात आला. यावेळी संमेलनाचे अध्यक्ष अरूण काकडे, नाटय़परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी, उपाध्यक्ष दीपक करंदीकर यांच्यासह नाटय़क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते. बेळगावमध्ये नाटय़संमेलन घेण्याचा ठराव नाटय़परिषदेने मंजूर केला तसे जाहीरही केले. मात्र, १ नोव्हेंबरपासून बेळगावसह १२ शहरांचे नामांतर झाल्यानंतर तिथे राजकीयदृष्टय़ा असंतोषाचे वातावरण आहे. सीमावासियांच्या मुस्कटदाबीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मात्र, कलेला कोणतीही भाषा नसते. त्यामुळे तेथील संघर्ष संमेलनाच्या व्यासपीठापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न कोणी करू नये, अशी अपेक्षा फैय्याज यांनी सत्काराला उत्तर देताना व्यक्त केली. इंदौरप्रमाणेच बेळगावचे प्रेक्षकही अत्यंत रसिक आणि दर्दी आहेत. याआधी अनेक संगीत नाटके , विविध कार्यक्रम आपण बेळगावमध्ये केले असून तिथल्यासारखा प्रेक्षक नाही. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदाच बेळगावमध्ये नाटय़संमेलन होत आहे त्यामुळे त्याचे महत्व वाढले आहे, असे त्यांनी सांगितले. बेळगावमध्ये सध्या तणावाचे वातावरण असल्याने तिथे नाटय़संमेलन घेत असताना सुरक्षा, विविध परवानग्या घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती दीपक करंदीकर यांनी दिली. त्याचबरोबर सुरक्षेच्या उपाययोजनांच्या दृष्टीने केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांचीही भेट घेतली असून बेळगावमधील खासदार, आमदार यांच्याही भेटीगाठी सुरू असल्याचे करंदीकर यांनी सांगितले. बेळगावमध्ये गेली अनेक वर्ष मराठी नाटक पोहोचत नाही. कारण, तिथे जाण्यासाठी नाटकांच्या बसेसना भरमसाठी कर भरावा लागतो. या नाटय़संमेलनाच्या निमित्ताने नाटकाच्या बसेसना लावण्यात येणारा कर माफ व्हावा, ही मागणी उचलून धरण्यात येणार असल्याचे मोहन जोशी यांनी सांगितले.