सध्या देशात जातीच्या व पोटजातीच्या ऐक्याची हाक दिली जात आहे. जातीचे संघटन पुरोगामी व स्वागतार्ह मानले जाते. पण सर्व जाती एकत्र करून हिंदूचे संघटन करणा-यांना मात्र प्रतिगामी व जातीयवादी ठरवले जाते. या उलटय़ा न्यायाबद्दल प्रा. शेषराव मोरे यांनी सडकून टीका केली.
सोळाव्या सामाजिक समरसता साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते. तत्पूर्वी शहरातून ग्रंथिदडीचे आयोजन करण्यात आले होते. उद्घाटन सोहळय़ाप्रसंगी व्यासपीठावर उद्घाटक डॉ. अशोक कुकडे, स्वागताध्यक्ष डॉ. गोपाळराव पाटील, निमंत्रक विश्वास गांगुर्डे, साहित्य परिषदेच्या अध्यक्ष श्यामा घोणसे, डॉ. भीमराव गस्ती, प्रा. मधुकर जामकर, लक्ष्मणराव टोपले, संजय कांबळे, डॉ. महेश देवधर उपस्थित होते.
प्रा. मोरे म्हणाले, समाजातील जातिव्यवस्था आज पूर्णपणे कोलमडून पडली आहे. केवळ बेटी व्यवहार जातीअंतर्गत होत आहेत. यातही जातीच्या बाहेर जाऊन विवाह करण्यासंबंधी पुढाकार घेणा-यांची संख्या समरसतावाद मांडणा-यांची अधिक आहे. याउलट तथाकथित समतावादी विचार मांडणारे केवळ बोलण्यात आघाडीवर असल्याचे ते म्हणाले. माझ्या पणजोबावर तुमच्या पणजोबाने अन्याय केला होता, अशी ओरड करत भूतकाळातील भांडण वर्तमानकाळात उकरून काढले जात आहे. जातीचा वापर केवळ राजकीय स्वार्थासाठी केला जातो. इंग्रजांच्या काळातील जातीची जनगणना ही नवीन स्वरूपात समोर येत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. जातिव्यवस्था ही धर्माने निर्माण केली नाही किंवा विशिष्ट वर्गाने निर्माण केली नाहीतर ती टोळी व्यवस्थेतून निर्माण झाली. जगभर टोळय़ा संपल्या. एक राष्ट्र, एक देव, एक धर्म अशी पद्धत सुरू झाली. भारतात सर्वाना सामावून घेण्याची पद्धत असल्यामुळे संघर्षांपेक्षा समन्वयावर भर दिला गेला. रामायण, महाभारत, पौराणिक वाङ्मय, तीर्थक्षेत्र यांनी देश एकात्म ठेवण्यासाठी मोठे योगदान दिले. आज राजकीयदृष्टय़ा हिंदू एकत्र आले तर भारतीय ऐक्याचा मार्ग मोकळा होईल, असे ते म्हणाले.
साहित्य संमेलनातून वैचारिक घुसळण होते. समाजाचे प्रबोधन यातून होते. इतिहासाचा मागोवा घेत भविष्याचा वेध घेण्यास मदत होते. सामाजिक समरसता साहित्यसंमेलनात समाजातील आडवे-उभे छेद एकत्र आल्याचे मत संमेलनाचे उद्घाटक डॉ. अशोक कुकडे यांनी व्यक्त केले. डॉ. गोपाळराव पाटील, विश्वास गांगुर्डे, डॉ. श्यामा घोणसे यांचीही समयोचित भाषणे झाली. राजाच्या विविध भागांतून सुमारे ४०० प्रतिनिधी या संमेलनास उपस्थित आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र गोळे व डॉ. शंकर धनके यांनी केले.