तालुक्यातील राशिन येथील जगदंबादेवीच्या पालखीच्या नगरप्रदक्षिणेने नवरात्रोत्सवाची सांगता झाली. पालखीच्या नगरप्रदक्षिणेत राज्यभरातून आलेले भाविक मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.  
राशिन हे तीर्थक्षेत्र माहुरगडची रेणुकामाता व तुळजापूरची रेणुकामाता या दोन्ही देवींचे जागृत स्थान म्हणून राज्यात प्रसिद्ध आहे. नवरात्रीमध्ये शारदीय उत्सवामध्ये येथे दर्शनासाठी राज्यातून लाखो भाविक आले होते. यंदा नवमी व दशमी एकाच दिवशी आल्याने दस-यांच्या दिवशी सकाळी विधिवत घट हलवण्यात आले. त्यानंतर रात्री देवीला कौल लावण्यात आला. देवीचा कौल मिळाल्यावर मंडळाचे विश्वस्त निळकंठराव देशमुख यांचे पुत्र शंकर देशमुख यांच्या छातीस देवीचे मुखवटे बांधण्यात आले व ते पालखीपर्यंत आणण्यात आले. या वेळी देवीचे सर्व मानकरी हजर होते. त्यानंतर ते देवीचे मुखवटे पालखीमध्ये ठेवण्यात आले. मुखवटे पालखीमध्ये ठेवल्यावर पालखी रात्री पावणेबारा वाजता नगरप्रदक्षिणेसाठी मंदिराच्या बाहेर काढण्यात आली. या वेळी दर्शनासाठी प्रचंड संख्येने भाविक उपस्थित होते. देवीच्या कुंकवाची मोठय़ा प्रमाणात उधळण करण्यात आली. त्यामुळे परिसरच लाल रंगाने माखला होता.
पालखी रात्री गावाबाहेरील वाडय़ावस्त्यांवर प्रदक्षिणेसाठी नेण्यात आली. ती सकाळी गावात आली. लोकांनी घरासमोर सडा, रांगोळय़ा काढून देवीचे स्वागत केले. या वेळी गावातील प्रत्येकाच्या घरासमोर ही पालखी थांबते. सर्वाच्या दर्शनाने संथगतीने पुढे सरकणारी पालखी मंदिरात येण्यास सोमवारची सायंकाळ झाली.   
तालुक्यातील कुळधरण येथील जगदंबादेवीच्या मंदिरातही अशाचप्रकारे देवीचा कौल लावून पालखीचा नगरप्रदक्षिणा सोहळा पार पाडण्यात आला. राशिन व कुळधरण या दोन्ही देवी बहिणी असून, या दोन्ही भगिनींची पालख्यांद्वारे रिवाजाप्रमाणे रात्री गावाबाहेर भेट झाली. भाविक दोन्हीकडील दिवटय़ा एकमेकांना काही किमी अंतरावरून दाखवतात, हीच या देवींची भेट मानली जाते.