रायगड जिल्हा परिषदेच्या रिक्त झालेल्या नवघर मतदार संघ सदस्य पदाच्या जागेसाठी आज मतदान होत आहे. या निवडणुकीत शिवसेना-काँग्रेस-मनसे महायुती व शेकाप-राष्ट्रवादी युती तसेच भाजप यांच्यात खरी लढत होणार आहे. उरण तालुक्यातील चौदा गावांतील मतदार यासाठी मतदान करणार आहेत. मतदानाची तयारी पूर्ण झाली असून मतदान शांततेत पार पडावी याकरिता कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ३० जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे.
विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे जिल्हा परिषद नवघर सदस्य मनोहर भोईर यांचा विजय झाल्याने त्यांनी राजीनामा दिला आहे. या रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. एकूण २५ मतदान केंद्रे असलेल्या नवघर मतदारसंघात २० हजार ९४३ मतदार आहेत. यापैकी १० हजार ४६३ महिला, तर १० हजार ४८० पुरुष मतदार असल्याचीही माहिती उरणचे तहसीलदार नितीन चव्हाण यांनी दिली आहे.
या मतदारसंघात विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराला साडेसात हजार मतदान झाले होते. त्यामुळे शिवसेनेच्या उमेदवाराचे पारडे जड आहे. या निवडणुकीत शिवसेनेच्या वतीने तुकाराम कडू, शेकापचे प्रकाश म्हात्रे व भाजपचे महेश कडू हे निवडणूक लढवीत आहेत.
नवघर जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी शुक्रवारी सिडकोच्या प्रकल्पग्रस्त प्रशिक्षण केंद्र बोकडविरा येथे होणार आहे.