मुंबईचा मेक ओव्हर करण्याच्या स्पर्धेत तेथे निर्माण होणाऱ्या डेब्रिजसाठी नवी मुंबई हे उत्तम डंपिग ग्राऊंड झाले असून येथील नगरसेवक, पालिका अधिकारी, कर्मचारी व पोलिसांच्या कृपेने दिवसागणिक शेकडो टन डेब्रिज नवी मुंबईतील मोकळ्या जागांवर रातोरात पडत आहे. मुंबईच्या या अतिक्रमणावर कोणाचाही अंकुश नसल्याने ‘आयो जावो नवी मुंबई तुम्हारी’ असे म्हणण्याची वेळ येथील नागरिकांवर येऊन ठेपली आहे. या डेब्रिज माफियांच्या विरोधात एकाही पक्षाने किंवा नगरसेवकाने टोकाचा आवाज उठविल्याचे ऐकिवात नाही, तर अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने डेब्रिजचे डोंगर नवी मुंबईत उभे राहिलेले दिसून येत आहेत.
मुंबई शहर आणि उपनगराच्या परिसरातील डेब्रिज सरसकटपणे नवी मुंबईतील मोकळया भूखंडावर टाकली जात आहेत. अतिक्रमण विभागातील अधिकाऱ्यांचे लागेबांधे डेब्रिज माफियाशी असल्यामुळे राजरोसपणे नवी मुंबई शहरात डेब्रिजचे डंपर घुसवून हे डेब्रिज ठरलेल्या ठिकाणी टाकून निघून जातात. या डेब्रिज माफियांना कोणाचेही भय नसल्याने १० गाडय़ांचे परवाने काढून या परवान्यावर शेकडो गाडय़ा नवी मुंबईत खाली करायचा गोरख धंदा डेब्रिज माफिया करतात. नवी मुंबईतील खाडी किनारी व मोकळय़ा भूखंडावर भरावाच्या नावाखाली आणलेला डेब्रिज टाकला जातो. त्यामुळे खारफुटींची कत्तल झाली असून बांधकाम व्यावसायिकांना या ठिकाणी इमारती बांधणे सोपे झाले आहे. पामबीचच्या अंतर्गत रस्त्यावर रेल्वे मार्गालगत डेब्रिजचे ढीगच्या ढीग पडलेले आहे. वाशी ते नेरुळ पामबीच मार्गावर खाडी किनारी व घणसोली खाडी किनारीलगत बनत असलेल्या नवीन मार्गावर डेब्रिज टाकले जात आहे. कोपरखरणे सेक्टर १९ परिसरातदेखील डेब्रिज टाकले आहे. शिरवणे परिसरात सर्रासपणे टाकल्या जात असलेल्या डेब्रिजबद्दल स्थायी समितीच्या सभेमध्ये जाब विचारणाऱ्या नगरसेविकेला प्रशासनाने दाद दिली नव्हती.
डेब्रिज टाकण्याच्या परवान्यामध्ये टाकलेला पत्ता प्रत्यक्षात मात्र डेब्रिज टाकण्याचे ठिकाण वेगळेच असते. महापे येथे एका भूखंडावर डेब्रिज टाकण्याची परवानगी पालिकेने देऊन टाकली. प्रत्यक्षात मात्र या ठिकाणी एमआयडीसीच्या उपअभियंत्याचे कार्यालय आहे. ही बाब उघड झाल्यानंतरदेखील संबंधितांवर आजतागायत कोणतीही कारवाई झालेली नाही. मुंबईत मोठय़ा प्रमाणात विकासाची कामे सुरू असून अनेक जुन्या इमारती, मिल जमीनदोस्त करण्यात आलेल्या आहेत. तो डेब्रिज टाकण्यास मुंबईत जागा उपलब्ध नसल्याने नवी मुंबईसारखे हक्काचे दुसरे ठिकाण या डेब्रिज माफियांना वाटत नाही. त्यासाठी स्थानिक नगरसेवक किंवा बडय़ा राजकारण्यांना हाताशी पकडून त्यांना प्रत्येक गाडीमागे पैसे ठरविले जात आहेत. त्यानंतर हे डेब्रिज बिनबोभाट टाकले जात आहे, ऐरोली सेक्टर १९ व २० येथील सिडकोच्या मोकळय़ा भूखंडावर डेब्रिज आणून टाकले जात आहे. दिघा येथील मुकुंद कंपनीच्या परिसरात, गणपती पाडा येथील पेट्रोल पंप नजीक असणाऱ्या मैदानामध्ये डेब्रिजच्या गाडय़ा उलटय़ा केल्या जातात. घणसोलीमधील मुख्य नाल्यानजीक डेब्रिज टाकण्यात आले आहे. कोपरखरणे तलावाच्या बाजूला डेब्रिजचे ढीग पडलेले आहेत. कोपरखरणे खाडी परिसर, नेरुळ, सीवूड, पामबीच, एमआयडीसी परिसरातील मोकळय़ा भूखंडावर तसेच एमआयडीसी जलवाहिनीला लागूनच डेब्रिज टाकले जाते.
ऐरोली व मानखुर्दमार्गे उरणला जात असल्याचे भासवून नवी मुंबई पालिकेच्या हद्दीत डेब्रिजच्या गाडय़ा रिकाम्या केल्या जातात. एमआयडीसीमध्ये मोकळय़ा भूखंडावर हे डेब्रिज टाकण्यासाठी प्रशासन व स्थानिकांशी हातमिळवणी केली जाते. पालिकेने नावापुरता ३० ते ३५ वाहने जप्ती करण्याची कारवाई केली होती. या वाहनांचा परवाना संपल्याचेदेखील कारवाई दरम्यान समोर आले होते. याचबरोबर पालिकेच्या कर्मचाऱ्यांना डेब्रिज माफियाकडून लाच घेतल्यामुळे निलंबनाची कारवाई करावी लागली आहे. मात्र बडय़ा अधिकाऱ्यांना या कारवाईची झळ बसत नसल्याने नवी मुंबईमध्ये डेब्रिज माफियांचा धुमाकूळ चालला आहे. मुंबईतील कचऱ्यांच्या नावाखालीदेखील नवी मुंबईत डेब्रिज येते. पावसाळय़ात या डेब्रिजमुळे जागोजागी पाणी साचल्याने पाण्याचा निचरा होत नाही. तसेच डेब्रिज टाकल्याने सुस्थितील भूखंडाची अवस्था दयनीय होत आहे.