खारघर येथील बलात्कार प्रकरणातील संशयित आरोपी गणेश कुमावत याच्या मृत्यूनंतर त्याचा मृतदेहासह त्याच्या नातेवाईकांना हद्दीच्या वादात तब्बल अठरा तास खोळंबून राहण्याचा प्रकार घडला आहे. या प्रकारामुळे त्रस्त झालेल्या कुमावत याच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला आहे.
खारघर वसाहतीमध्ये मजूर मुलीवर बलात्कार झाल्याचा प्रकार घडला होता. याप्रकरणी लादी बसविणारा कंत्राटदार गणेश कुमावत (५२) याला संशयावरून पोलिसांनी शुक्रवारी रात्री अटक केली होती. कुमावत याची घरझडती घेत असताना त्याच रात्री साडेअकरा वाजता त्याने पोलिसांना गुंगारा देऊन घराच्या छतावरून उडी मारली. जखमी अवस्थेमधील कुमावत याला उपचारासाठी वाशी येथील महानगरपालिकेच्या रुग्णालयात नेण्यात आले. परंतु तेथेच त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. ही आत्महत्या पश्चात्तापामुळे किंवा अब्रू वाचविण्यासाठी केली असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
शनिवारी कुमावत याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यापेक्षा पंचनामा करण्याचे ठरविले. पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आरोपीचा मृत्यू झाल्यास संबंधित मृतदेहाचा पंचनामा तहसीलदार यांनी करावा, असे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आहेत. त्यानुसार खारघर पोलिसांनी कुमावत यांच्या मृत्यूची माहिती पनवेलचे प्रांत अधिकारी सुदाम परदेशी व तहसीलदार दीपक आकडे यांना कळविली. तहसीलदार आकडे हे पंचनाम्यासाठी शनिवारी सकाळी खारघर पोलीस ठाण्यात आले. पंरतु येथे आल्यावर आकडे यांना कुमावत यांचा मृतदेह वाशी येथे असल्याचे कळाले.
वाशी हे ठाणे जिल्ह्य़ाच्या हद्दीत येत असल्याने मी वाशी येथील रुग्णालयात जाऊन पंचनामा करणार नाही, अशी भूमिका आकडे यांनी घेतली. हवे असल्यास कुमावत यांचा मृतदेह पनवेलमध्ये आणा, त्यानंतर मी पंचनामा करेन असेही तहसीलदारांनी पोलिसांना सांगितले.
यावर अनेक पोलीस अधिकाऱ्यांनी या पूर्वीच्या अशा घडलेल्या घटनेचा दाखला देऊन तहसीलदार आकडे यांना पंचनामा करण्यास सांगितले. मात्र त्याचा कोणताही परिणाम तहसीलदारांवर झाला नाही. ते आपल्या निर्णयावर ठाम राहिले. अखेर तहसीलदारांच्या हट्टापायी नवी मुंबई पोलीस दलाच्या वतीने लेखी विनंतीपत्र नवी मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना देण्यात आले. त्यानंतर शवविच्छेदनापूर्वी कुमावत याचा मृतदेह पनवेलच्या ग्रामीण रुग्णालयात पुन्हा आणण्यात आला. तोपर्यंत दुपारचे बारा वाजून गेले होते.
तहसीलदारांच्या पंचनाम्यानंतर सायंकाळी मुंबई येथील जे. जे. रुग्णालयात कुमावत याच्या मृतदेहाचे विच्छेदन करण्यात आले. त्यानंतर ते शव त्यांच्या नातेवाईकांना सोपविण्यात आले. कुमावत यांच्या मृत्यूनंतर तब्बल १८ तासांनी सरकारी लाल फितीचा फेरा संपला आणि त्यांचे पार्थिव त्यांच्या नातेवाईकांना मिळाले.
कुमावत याच्यावर कोणताही आरोप सिद्ध झाला नव्हता. मात्र समाजात अब्रू जाईल या भीतीने कुमावत याने हे पाऊल उचलले असल्याचे सांगितले जाते. त्याच्या मृत्यूनंतरही त्याच्या मृतदेहाची अवहेलना केल्याची खंत खुद्द पोलीस दलातून व्यक्त होत आहे.

पनवेलचे तहसीलदार दीपक आकडे यांनी सीआरपीसी सेक्शन २० च्या कलम तरतुदीनुसार गणेश कुमावत या संशयित आरोपीच्या मृत्यूनंतर प्रथमदशर्नी अहवालाचा पंचनामा योग्य प्रकारे केला आहे. शुक्रवारी रात्रीच्या वेळी पंचनामा करणे योग्य नसल्याने हा पंचनामा पनवेल येथे शनिवारी सकाळी करण्यात आला. वाशी येथील महानगरपालिकेच्या रुग्णालयात तहसीलदार आकडे यांचा पंचनामा करण्यासाठी जाण्याचा प्रश्नच येत नाही. प्रत्येक तहसीलदारांना कार्यकक्षा शासनाने ठरवून दिलेली आहे. पोलिसांनी वाशी परिसरातील तहसीलदारांना बोलावण्याचा प्रयत्न केला होता.
सुदाम परदेशी, (प्रांत अधिकारी, पनवेल)