स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महिलांना पन्नास टक्केआरक्षण देण्याच्या निर्णयानंतर राज्यात होणाऱ्या नवी मुंबई पालिकेच्या पहिल्याच निवडणुकीत आरक्षणामुळे १११ प्रभागापैकी ५६ प्रभागात महिला निवडून येणार असून काही ठिकाणी खुल्या प्रवर्गात महिलांना सुवर्णसंधी मिळणार आहे. त्यामुळे एप्रिलमध्ये नवी मुंबई पालिकेच्या सभागृहात कमीत कमी ६० नगरसेविका राहणार असल्याने शहरावरील पुरुषांची हुकमत संपुष्टात येणार आहे. त्यात मनासारखा प्रभाग पडावा यासाठी पार तिरुपती बालाजीपासून भराडीदेवीपर्यंत साकडे घालणाऱ्या इच्छुक उमेदवारांच्या इच्छा-आकांक्षा अपेक्षांवर पाणी फेरले गेले आहे. त्यामुळे शनिवारनंतर शहरात थोडी खुशी जादा गम असल्याचे वातावरण आहे.

नवी मुंबई पालिकेच्या पाचव्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शनिवारी राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने प्रभाग रचना व आरक्षण वाशी येथील भावे नाटय़गृहात जाहीर करण्यात आले. त्यानंतर अनेक विद्यमान नगरसेवकांच्या दांडय़ा गुल झाल्याने त्यांचे चेहरे पाहण्यासारखे झाले होते. यात नगरसवेक संतोष शेट्टी, राजू शिंदे, वैभव गायकवाड, दिलीप घोडेकर, राजू पाटील, मनोज हळदणकर, अनंत सुतार, केशव पाटील, संजय पाटील, शंकर मोरे, सूरज पाटील यांचा समावेश असून त्यांचे प्रभाग राखीव झालेले आहेत. ज्या ठिकाणी महिला राखीव झाले आहे त्या ठिकाणी त्यांच्या पत्नी नशीब आजमवणार आहेत. गतवर्षी पेक्षा या वर्षी २२ प्रभाग वाढले असून यात ५६ प्रभागात महिलाराज दिसून येणार आहे. याशिवाय सर्वसाधारण प्रभागातून पाच-सहा महिला निवडून येण्याची शक्यता जास्त असल्याने ही संख्या साठी पार करणारी आहे. वाढलेल्या प्रभागांची संख्या घणसोली, कोपरखैरणे, आणि नेरुळ नोडमध्ये जास्त आहे. मागील पाच वर्षांत या भागातील लोकसंख्या वाढल्याचे दिसून येते. ऐरोलीसारख्या ठिकाणी एका प्रभागाचे चक्क तीन ते चार प्रभाग पडले आहेत. प्रभाग रचनेमुळे अद्यापि अनेक इच्छुक उमेदवार संभ्रमात असून प्रभागांची रचना वेडीवाकडी करण्यात आल्याचे आरोप केले जात आहेत. त्याबद्दल लवकरच निवडणूक आयोगाकडे तक्रारी केल्या जाणार आहेत. गुगल अर्थचा वापर करून करण्यात आलेली ही प्रभाग रचना वस्तुनिष्ठ नसल्याचे दिसून येते. त्यामुळे प्रभागाच्या जवळ असणारा भाग प्रभागात अंतर्भूत न करता दूरवरचे भाग जोडण्यात आलेले आहेत. या रचना व आरक्षणामुळे पक्षांतर करण्याचे मनसुबे रचणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी घूमजाव केला असून जे जे होईल ते ते पाहावे अशी भूमिका घेतली आहे. देश आणि राज्यात घडलेल्या परिवर्तनामुळे अगोदरच ढवळून निघालेले राजकारण आरक्षणामुळे स्तंभित झाले असून या वेळी सभागृहात ९० टक्के नवीन चेहरे दिसून येणार, हे मात्र स्पष्ट झाले आहे.

प्रभाग रचना व आरक्षण
नवी मुंबई महानगरपालिकेच्या एप्रिल महिन्यात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शनिवारी १११ प्रभागांची आरक्षण सोडत वाशी येथील विष्णुदास भावे नाटय़गृहात काढण्यात आली. हे सर्व आरक्षण पालिकेच्या विद्यार्थ्यांकडून चिठ्ठी सोडत पद्धतीने काढण्यात आले. यावेळी सर्व पक्षीय कार्यकर्ते मोठय़ा प्रमाणात उपस्थित होते. राज्य निवडणूक आयोगाने पालिकेच्या १११ प्रभागांची रचना ११ लाख २० हजार ५४७ लोकसंख्याच्या अनुषंगाने केली आहे. यात २ अनुसूचित जाती, १० अनुसूचित जमाती, ३० इतर मागासवर्गीस, ६९ खुल्या गटासाठी आज आरक्षण सोडत काढण्यात आली. यात ५० टक्के म्हणजेच अर्थात ५६ प्रभाग हे महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत.
35