ग्रामपंचायतीमधून थेट महानगरपालिकेत रूपांतर झालेल्या नवी मुंबई पालिकेला सिडकोने दिलेल्या जमिनींच्या बळावर गेल्या २४ वर्षांत नवी मुंबई पालिका सुमारे पंचवीस हजार कोटींच्या मालकीची धनी झाली असून, सध्या शहरातील एकूण एक हजार ५६३ मालमत्ता पालिकेच्या ताब्यात आहेत. यात खालापूर येथील मोरबे धरणासाठी घेण्यात आलेली एक हजार १८५ हेक्टर जमीन ही पालिकेकडे असलेली सर्वात जास्त जमीन असून या जमिनीची आजच्या बाजाराभावाप्रमाणे अंदाजित रक्कम तीन हजार कोटीच्या घरात आहे. याशिवाय कोपरखैरणे व तुर्भे येथील विस्तीर्ण क्षेपणभूमी (डंपिंग ग्राऊंड) या जमिनीदेखील पालिकेच्या मालकीच्या आहेत. पालिकेची ही पत शासकीय किंवा खासगी कर्ज घेण्यास उपयोगी पडणारी आहे. त्यामुळेच नवी मुंबई पालिकेला राज्यातील एक श्रीमंत पालिका म्हणून ओळखले जात आहे.
नवी मुंबई पालिकेचे आयुक्त आबासाहेब जऱ्हाड यांनी गेले वर्षभर पालिकेच्या मालमत्तांची माहिती गोळी करण्यास प्राधान्य दिले. यापूर्वी पालिकेत २१ आयुक्त होऊन गेले, पण पालिकेची ‘किंमत’ किती, याचा शोध घेण्याचा कोणी प्रयत्न केला नाही. काही आयुक्तांनी ही पालिका कशी लुटता येईल याचाच जास्त विचार केला. त्यामुळेच टक्केवारीसाठी मोठे प्रकल्प काढून मलिदा कमविण्यावर भर दिल्याचे दिसून येते. नवी मुंबई पालिकेच्या मालमत्ता विभागाने गेले वर्षभर केलेल्या सव्‍‌र्हेक्षणात पालिकेच्या मालकीच्या १५६३ मालमत्ता असल्याचे स्पष्ट झाले आहे. यात सिडकोकडून हस्तांतरित करून घेण्यात आलेली २२९ उद्याने, ७५ खेळाची मैदाने, ६ अग्निशमन दल, २४ तलाव, ८५ विहिरी, ६६ शाळा, ५४ समाजमंदिरे, २ नाटय़गृहे, १०२ बहुउद्देशीय मंदिरे, ११ वाचनालये यांचा समावेश आहे. याशिवाय रस्ते, वीज, गटारे यांचेही हस्तांतरण झाले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आलेली तुर्भे येथील डंपिंग ग्राऊंडची केवळ जमीन ६५ एकर असून, आणखी ३८ एकर मागण्यात आली आहे. सिडकोने आतापर्यंत ४९४ भूखंड पालिकेला दिले असून, यावर्षी १२७ भूखंड पदरात पाडून घेण्यात पालिका यशस्वी ठरली आहे. आणखी ४६९ भूखंडांची मागणी प्रलंबित असून सिडको ती लवकरच पूर्ण करणार आहे. हे भूखंड रुग्णालय, शाळा यासारख्या सार्वजनिक हितासाठी वापरले जाणार आहेत. पालिकेच्या मालमत्तांचे मूल्यांकन झाल्यामुळे त्यांचे प्रॉपट्र्री कार्ड बनण्यास आता मदत होणार आहे. सिडकोकडून लवकरच मिळणाऱ्या भूखंडामुळे पालिकेच्या मालमत्तांचे मूल्य आणखी वाढणार असून, सोन्याचा भाव असलेल्या जमिनीच्या या नगरीतील ही पालिका लवकरच मुंबई पालिकेच्या मालमत्तांशी तुलना करणारी ठरणार आहे.