गणेश विसर्जनानंतर कोणत्याही क्षणी आगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची भीती लक्षात घेऊन नवी मुंबई पालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रशासनाला ६० उद्घाटनांचा बार उडवून देण्यास भाग पाडले. यात ३२ मोठे प्रकल्प असून २८ छोटे नागरी कामांचे शुभारंभ कार्यक्रम आहेत. त्यामुळे गेली पाच वर्षे कासवगतीने चालणारी अनेक विकासकामे मोदी फॅक्टरमुळे मार्गी लागल्याची चर्चा आहे.
लोकसभा निवडणुकीत दिग्गज राजकारण्यांचा अक्षरश: धुव्वा उडाला. त्यामुळे अनेक जणांची हवेत घिरटय़ा घालणारी विमाने जमिनीवर आली. ठाणे लोकसभा निवडणुकीत संजीव नाईक यांनी सपाटून मार खाल्ल्यानंतर नवी मुंबईतील सत्ताधारी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा पालकमंत्री गणेश नाईक यांनाही मोठा धक्का बसला. त्यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबईत ते ४९ हजार मतांनी पिछाडीवर आहेत.
त्यामुळे विकासाचा मुद्दा घेऊन देशातील राजकारण ढवळून काढणाऱ्या पंतप्रधान मोदींच्या पावलावर पाऊल ठेवून नवी मुंबईतील अनेक विकासकामांचे उद्घाटन करून घेण्यात आले आहे. काही प्रकल्पांना सर्वसाधारण सभा व स्थायी समितीच्या विशेष सभा आयोजित करून तातडीने मंजुरी घेऊन कामांचा शुभारंभ करण्यात आला. सिडको आणि पालिकेने नवी मुंबईत अनेक विकासकामांची मुहूर्तमेढ रोवलेली आहे, मात्र त्याची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात राज्यकर्ते कमी पडले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी पालिकेच्या माध्यमातून तीन रुग्णालयांतील ओपीडी, ऐरोलीतील नाटय़गृह, घणसोलीतील सेंट्रल पार्क, ठाणे-बेलापूर मार्गाला पर्यायी मार्ग, आठ बहुउद्देशीय इमारती, महिला सक्षमीकरण केंद्र, अण्णासाहेब पाटील, अण्णासाहेब साठे यांची स्मृती भवने यांसारख्या ३२ मोठय़ा प्रकल्पांचा शुभारंभ करण्यात आला, तर रस्ते, इमारत, उद्यान, पायाभूत सुविद्यांसारख्या २८ कामांची उद्घाटने करण्यात आली.
विधानसभेच्या नावाने अनेक नगरसेवकांनी आपलेही चांगभले करून घेतले असून मागील एक महिन्यात प्रस्ताव आणि ठरावांची संख्या एक हजापर्यंत गेल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
यात नवी मुंबईतील जमीन फ्री होल्ड करण्यासारखा अशासकीय ठराव वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची चिन्हे आहेत.