दिघा येथील स्मशानभूमीचे काम एक वर्ष उलटूनही पूर्ण होऊ न शकल्याने या ठिकाणी अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. ठेकेदार आणि प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे हे काम रखडले असल्याने नागरिक चांगलेच संतापले असून ठेकेदारावर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नगरसेवक नवीन गवते यांनी आयुक्तांकडे केली आहे.

प्रभाग क्रमांक ३ येथील दिघा मध्यवर्ती स्मशानभूमीच्या अद्ययावत उभारणीकरिता एक कोटी ६० लाख रुपये खर्च करण्यात येत आहे. मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात सदरच्या कामाला सुरुवात करण्यात आली. मात्र वर्ष उलटूनही या ठिकाणचे काम ४० टक्केदेखील पूर्ण झालेले नाही.
या ठिकाणी असणाऱ्या शवदाहिनीचा लोखंडी चौथरा चोरीला गेला. दरम्यान, सदरच्या स्मशानभूमीच्या नूतनीकरणाचे काम दुसऱ्या ठेकेदाराला देण्यात आले. मात्र त्या ठेकेदाराकडून नियोजित वेळेत काम पूर्ण करण्यात न आल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. याबाबत स्थानिक नगरसेवक नवीन गवते यांनी पालिका आयुक्तांना याबाबत लेखी निवेदन देत ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
या संदर्भात नवी मुंबई महानगरपालिका शहर अभियंता मोहन डंगावकर यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.