सायबर सिटी, मेट्रो सिटी आणि ग्रीन सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबई शहराला लवकर गार्डन सिटी म्हणून ओळखले जाण्याची शक्यता निर्माण झाली असून सिडकोने बसवलेली पालिका क्षेत्रामध्ये छोटी मोठी १९९ उद्याने आहेत. प्रत्येक नोडमध्ये पाच ते सहा उद्याने असून काही उद्यानांचे उद्यान व्हिजनअंतर्गत पालिकेने अलीकडे सुशोभीकरण केले आहेत. पण देखभाल, सुरक्षा यंत्रणा, नगरसेवकांचा कानाडोळा यामुळे काही उद्यानांची दयनीय अवस्था झाली आहे.
सिडकोने शहरात ४६ टक्के मोकळी जमीन ठेवली आहे. यात उद्यानांना प्राधान्य देण्यात आले असून वीस वर्षांपूर्वीपासून नवी मुंबई महानगरपालिकेने टप्प्याटप्प्याने या सेवेवर करोडो रुपये खर्चून उद्यानांनी सुशोभीकरण करण्यात आले आहे. जनतेचे करोडो रुपये खर्च करण्यात आलेल्या या उद्यानामध्ये केवळ सुरक्षा रक्षक नसल्यामुळे ही उद्याने मद्यपि, जुगारी व प्रेमीयुगलांचे आश्रयस्थाने बनली आहेत. उद्यानामध्ये खेळण्यास सक्त मनाई असतानादेखील क्रीडाप्रेमी बिनधास्त उद्यानांमध्ये येऊन खेळत असतात, त्यामुळे वॉकसाठी येणाऱ्या नागरिकांना यांचा नाहक त्रास सहन करावा लागतो. पाच वर्षांपूर्वी ऐरोली येथील चिंचवली उद्यानात फुटबॉल खेळणाऱ्या मुलांना अटकाव करणाऱ्या जयेश ठाकूर या तरुणाला मुलांनी बेदम मारहाण केली होती. त्यात त्याचा मृत्यू झाला, तरीही पालिकेने सुरक्षा रक्षकांची बाब मनावर घेतली नाही. उद्यानामध्ये विजेचे दिवे बंद अवस्थेत असल्यामुळे रात्रीच्या वेळी अंधाराचे साम्राज्य पसरलेले दिसून येते. त्यामुळे उद्यानामध्ये रात्रीच्या वेळी तळीराम बिनधास्तपणे मद्यपान करत बसलेले असतात. पोलिसांचे याकडे लक्ष नाही. उद्यानामध्ये लहान मुलांच्या खेळांच्या साहित्यावर मोठी मुले बसत असल्यामुळे खेळांचे साहित्य तुटलेल्या अवस्थेत आहेत. उद्यानांमध्ये कचराकुडय़ांची व्यवस्था नसल्यामुळे उद्यानामध्ये आलेले नागरिक उघडय़ावरच कचरा टाकतात.  अनेक उद्यानांच्या लोखांडी ग्रिल्स, आसनव्यवस्था तुटलेल्या अवस्थेत आहेत.  
ऐरोली सेक्टर १७ मधील रामदास बापू पाटील उद्यानाच्या बाजूला सिडकोच्या भूखंडावर बेकायदेशीर झोपडय़ा बांधून राहत असणारे नागरिक झोपण्यासाठी उद्यानामध्ये येतात व  खाण्याचे पदार्थदेखील तिथेच टाकतात. शौचालयाची दरवाजे तुटलेल्या अवस्थेत असून शौचालयाची साफसफाई करण्यात येत नसल्यामुळे दरुगधी येते. हे उद्यान म्हणजे जुगारी, तळीरामांचा अड्डा आहे. दिघा येथील साने गुरुजी बाल उद्यानामध्ये पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने बच्चे कंपनीला त्रास सहन करावा लागतो. ऐरोली सेक्टर ३ मधील राजीव गांधी उद्यानामध्ये मुले फुटबॉल किंवा क्रिकेट खेळत असल्यामुळे उद्यानामध्ये येणाऱ्या माहिलांना त्रास सहन करावा लागतो. तर रात्रीच्या वेळी या उद्यानामध्ये प्रेमीयुगुल अंधाराचा फायदा घेत अश्लील चाळे करत असल्याचे दिसून येते.
कोपरखरणे येथील शिवाजी पाटील उद्यानामध्ये ओपन जिम सुरू करण्यात आली होती, पण देखभाली अभावी तीची दुर्दशा झाली आहे. रॉक गार्डनमध्ये बसवण्यात आलेल्या शोभेच्या वस्तू तुटलेल्या अवस्थेत आहेत. कोपरखरणे सेक्टर ३ मधील चिकणेश्वर उद्यानामधील वृक्षांची कत्तल करून झाडे बोडकी करण्यात आली आहे. कोपरखरणे येथील अण्णासाहेब पाटील उद्यानामध्ये खेळांचे साहित्य तुटलेल्या अवस्थेत आहेत. विश्रांतीसाठी बसवण्यात आलेली आसनव्यवस्थादेखील मोडकळीस आलेल्या आहेत. बेलापूर गावामध्ये पालिकेचे उद्यान आहे, मात्र यांची दुर्दशा झाली असून उद्यानाचे प्रवेशद्वार तुटलेले अवस्थेत आहे. प्रवेशद्वारासमोरच वाहने पार्क करण्यात येत असल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. बेलापूर कोळीवाडा गावामधील उद्यानांमधील खेळांचे साहित्य तुटेल्या अवस्थेत आहेत. या ठिकाणी रात्रीच्या वेळी मद्यपि मद्यपान करत असतात, असे नम्रता पाटील यांनी सांगितले. नेरुळमधील वंडर्स पार्कमध्येदेखील प्रेमी युगुलांची संख्या वाढली असनू त्यांच्या वर्तनाविषयी येणाऱ्या नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. पालिकेने लहान मुलांसाठी विविध फळांचे आकार असलेल्या छताची बैठक व्यवस्था तयार केली आहे. या बैठक व्यवस्थेचा ताबा प्रेमीयुगुलांनी घेतला आहे.
शरद वागदरे, नवी मुंबई

माझे शहर  माझे मत
रिक्षाचालकांची मनमानी
नवी मुंबईत परिवहनच्या बसेस सर्वच ठिकाणी जात नाही, तसेच वेळेतदेखील येत नाही. त्यामुळे नाइलास्तव रिक्षाने प्रवास करावा लागतो. पण रिक्षाचालक मनमानीप्रमाणे भाडे आकारतात. प्रवाशांशी अरेरावीपणे वागतात. सुट्टे पैसे देण्यावरून वाद घालत असतात. त्यामुळे त्रास सहन करावा लागतो. कुठे तरी रिक्षाचालकांची होणारी मुजोरी थांबविणे आवश्यक आहे.
उमेश गायकवाड, घणसोली

शहरामध्ये झाडे लावली पाहिजेत
नवी मुंबईला ग्रीन सिटी म्हणून संबोधले जाते. पण शहरामध्ये झाडे लावण्यात येतात, पण ते वाढण्यासाठी कोणतीच उपाययोजना केली जात नाही. शहरामध्ये झाडे नसल्यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे. एमआयडीसीमध्ये असणाऱ्या कंपनीच्या बाजूने झाडे लावणे हे बंधनकारक केले पाहिजे. तसेच सोसायटय़ांमध्ये रस्त्यांच्या कडेने झाडे लावणे बंधनकारक केले पाहिजे.
अरुण सांळुखे, घणसोली

रस्त्यांवरील खड्डय़ांकडे प्रशासनाने लक्ष द्यावे
शहरामध्ये रस्त्याला पडलेल्या खड्डय़ांमुळे त्रास सहन करावा लागतो. रस्त्यांची निकृष्ट दर्जाची कामे करण्यात येत असल्यामुळे पावसाळ्यामध्ये दरवर्षी रस्त्यांना खड्डे पडतात. त्यामुळे वाहन चालवणे जिकीरीचे होऊन जाते, तर खड्डय़ामुळे अपघातदेखील घडतात. तरी रस्त्याची कामे ही चांगल्या दर्जाची करण्यात यावी अशी अपेक्षा आहे.  
सागर कांबळे, बेलापूर

अंतर्गत रस्त्यांवर अवजड वाहनबंदी हवी
नवी मुंबईतील शहरामध्ये गाव गावठाण व सेक्टरमधील अंतर्गत असणाऱ्या रस्त्यांवर अवजड वाहनांना बंदी घातली पाहिजे. अवजड वाहने अंतर्गत रस्त्यांवर येत असल्यामुळे वाहतूक कोंडी होत असून अपघातदेखील होतात. त्यामुळे अंतर्गत रस्त्यांवर अवजड वाहनांना बंदी घालणे अपेक्षित आहेत.
सचिन विनेरकर, बेलापूर

पाणपोईची सोय करण्यात यावी
शहरामध्ये ठिकठिकाणी पिण्यासाठी स्वच्छ पाण्याची सोय करण्यात यावी. शहरामधील उद्यानामध्ये, बस स्थानक, रेल्वे स्थानक या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय नसल्यामुळे त्रास सहन करावा लागतो. तहान लागल्यामुळे मिनरल वॉटर घेणे दर वेळी शक्य नसते. तरी शहरामधील चौकाचौकात पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात यावी, अशी अपेक्षा आहे.  
अंकिता पवार, ऐरोली