नवी मुंबईसह पनवेल व ठाणे परिसरातील कलाप्रेमींसाठी नवी मुंबई महापालिका आणि आर्ट देश यांच्या संयुक्त विद्यमाने बेलापूर येथील अर्बन हाटमध्ये २४ ते २८ जानेवारी या कालावधीत ‘नवी मुंबई कला महोत्सव- २०१३’ आयोजित करण्यात आला असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन होणार आहे.   
देशभरातील २०० हून अधिक कलावंत चित्रकला, शिल्पकला, रांगोळी, फिंगर पेंटींग, वाळू शिल्पकला, मातीची भांडी बनविणे, लाकूड कोरीव काम, रेखाचित्र, अक्षर सुलेखन आदी कलांचे प्रत्यक्ष सादरीकरण या महोत्सवात करणार असल्याने कला रसिकांसाठी ही एक मोठी पर्वणीच ठरणार आहे.
मुंबईत फोर्ट परिसरात होणाऱ्या काळा घोडा महोत्सवासारखाच एखादा उपक्रम नवी मुंबईतही असावा, अशी आमची खूप वर्षांपासूनची इच्छा होती. नवी मुंबईतही अनेक कलावंत वास्तव्यास असल्याने त्यांनाही या महोत्सवामुळे एक व्यासपीठ मिळेल, अशी आशा व्यक्त करतानाच या महोत्सवाचे आयोजक गौतम पाटोळे यांनी यातून जमा होणाऱ्या निधीपैकी निम्मी रक्कम एका तरूणीच्या उपचारांसाठी वापरली जाणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले.
या महोत्सवात छायाचित्रण तसेच चित्रकला कार्यशाळा, अच्युत पालव यांचे सुलेखन प्रात्यक्षिक, आरती परांजपे यांचे नृत्य, ४० फुटी कठपुतली, पथनाटय़े सादर केली जाणार आहेत. त्याचप्रमाणे मोरेश्वर पवार एक मोठी मूर्ती साकारणार आहेत.
या महोत्सवात सिडकोचे विशेष सहकार्य लाभले आहे. महोत्सवात रसिकांना विनामूल्य प्रवेश असणार आहे.