विधानसभा निवडणुकीपासून लोकप्रतिनिधींचा सुरू झालेला पक्षांतराचा सिलसिला आता पालिका निवडणुकीपर्यंत आला आहे. एप्रिल महिन्यात होणाऱ्या नवी मुंबई व औरंगाबाद पालिका निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर मोठय़ा प्रमाणात आजी-माजी नगरसेवकांच्या कोलांटय़ाउडय़ांना सुरुवात झाली आहे. नवी मुंबईतील राष्ट्रवादीच्या दोन व काँग्रेसच्या पाच नगरसेवकांनी सोमवारी शिवसेनेचे शिवबंधन हातावर बांधून घेतले आहे. यानंतर राष्ट्रवादीचे सुमारे १६ नगरसवेक असा पक्षबदल करणार असून शिवसेना किंवा भाजप ही त्यांची पसंती राहणार आहे.
देश व राज्य पातळीवर झालेल्या राजकीय बदलाचे पडसाद गाव, तालुका, जिल्हा, शहर पातळीवर उमटू लागले आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस, राष्ट्रवादीमध्ये काही भवितव्य नाही असे ओळखून अनेक पंचायत, जिल्हा परिषद निवडणुकीत पदाधिकाऱ्यांनी आपल्या पक्षांची साथ सोडण्याचे कार्यक्रम सुरू केले आहेत. मुंबईनंतर राज्यात तिसरी श्रीमंत पालिका असलेल्या नवी मुंबई पालिकेत प्रभागातील सत्ता कायम ठेवण्याचे विद्यमान नगरसेवकांचे स्वप्न आहे. या पालिकेत निघणाऱ्या कोटय़वधींच्या कामात नगरसेवकांचा हिस्सा लक्षवेधी असल्याने भल्या भल्या नगरसवेकांना ही पालिका हातातून जाणे परवडण्यासारखे नाही. त्यासाठी कोणताही मार्ग पत्करावा लागला तरी त्यांची तयारी आहे. यात पक्षांतर हा तर नगरसवेकांचा आवडीचा विषय झाला असून भाजप-शिवसेना या सत्तेतील दोन पक्षांना मोठी मागणी आहे. त्यामुळे पाच वर्षांपूर्वी काडीमोड घेतलेल्या पक्षात पुन्हा जाण्यास हे नगरसवेक मागे-पुढे पाहात नसल्याचे दिसून येते. प्रत्येक पाच वर्षांत नवीन पाट लावणाऱ्या कोपरखैरणेतील नगरसेवक शिवराम पाटील यांनी पुन्हा शिवसेनेशी घरोबा केला आहे. शिवसेनेलाही या वेळी पालिकेवर भगवा फडकवायचा असल्याने लोकसभा, विधानसभा निवडणुकीत प्रतिस्पध्र्याना मदत करणाऱ्या अनेक नगरसेवकांना पायघडय़ा घातल्या जात आहेत. त्यामुळे काल-परवापर्यंत शिवसेनेच्या नावाने शंख करणाऱ्या काँग्रेस राष्ट्रवादीतील नगरसवेकांना सन्मानाने पक्षात घेतले जात असल्याने जून्या जाणत्या शिवसैनिकांवर अन्याय होत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
अनेक वर्षे समाजकारण केल्यानंतर नगरसेवक बनण्याचे संधी प्राप्त झाल्यानंतर पक्षप्रमुख अशा प्रकारे उपऱ्यांना कवटाळणार असतील तर सर्वसामान्य शिवसैनिकांचा विचार करणारी शिवसेना गेली कुठे, असा सवाल शिवसैनिक करू लागले आहेत. आम्ही केवळ झेंडेच हातात घ्यायचे का, असा सवाल या सैनिकांचा आहे. पाटील दाम्पत्यांच्या या शिवसेना प्रवेशामुळे येथील शिवसैनिकांचे पत्ते कापण्यात आले आहेत. हीच स्थिती कोपरी गावातील काँग्रेसचे नगरसेवक विलास भोईर यांच्या प्रभागात होणार असून हे नगरसेवक केवळ पुन्हा नगरसेवक होण्यासाठी शिवसेनेत गेले आहेत. त्यांना शिवसेनेबद्दल प्रेम, माया, जिव्हाळा नाही. याचा पक्षश्रेष्ठी कसा विचार करीत नाहीत, असा प्रश्न शिवसैनिकांना पडला आहे. या शिवाय अंकुश सोनावणे, रंगनाथ औटी, रामाशेठ वाघमारे, अरविंद नाईक या काँग्रेसच्या आजी-माजी नगरसेवकांनी पाच वर्षांची सत्ता भोगल्यानंतर आपल्या पक्षांना ठेंगा दाखविला आहे. याची सुरुवात काँग्रेसचे नामदेव भगत, प्रकाश माटे, सुनील पाटील या आजी-माजी नगरसवेकांनी केली आहे. त्यामुळे गेली वीस वर्षे या क्षणाची वाट पाहणाऱ्या शिवसैनिकांची मोठी पंचाईत झाली आहे. काही उपऱ्या उपनेत्यांच्या सांगण्यावरून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे डोळे झाकून मातोश्रीवर येणाऱ्या प्रत्येक दुसऱ्या पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या गळ्यात व हातात भगवा झेंडा देत आहेत, पण हा झेंडा देताना ते यानंतर तरी सेनेबरोबर एकनिष्ठ राहतील का याची खात्री त्यांनाही नाही. या घाऊक पक्षांतरामुळे मूळ पक्षातील कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.