*    नवीन मुख्यालयाची स्वच्छता घनकचरा विभागाच्या भरोसे
*     कबुतरांसाठी सुंदर आशियाना, अद्यापही कामकाज सुरू
लोकसभा निवडणुकीची केवळ आचारसंहिता लागण्यापूर्वी उद्घाटनाचा बार उडवून दिलेल्या नवी मुंबई पालिकेच्या नवीन आलिशान मुख्यालयाची स्वच्छता शहर साफ करणाऱ्या घनकचरा विभागाच्या कामगारांवर सोपविण्यात आली आहे. विद्युत जोडणीची अनेक कामे शिल्लक राहिलेल्या या मुख्यालयात अनेक ठिकाणी छोटी मोठी कामे अद्याप सुरू असल्याने नवीन फरशांना ओरखडे पडण्याचे प्रमाण जास्त आहे. प्रमुख विभागांचे संगणक पूर्णपणे कार्यान्वित न झाल्याने अनेक विभागप्रमुखांनी जुन्या मुख्यालयात समांतर काम सुरू ठेवले आहे.
नवी मुंबई पालिकेने १७० कोटी रुपये खर्च करून बांधलेले बेलापूर सेक्टर ५० येथील मुख्यालय आजही अनेक समस्यांच्या गर्तेत हरवलेले आहे.  उद्घाटनानंतर दीड महिने या मुख्यालयातील स्थापत्य व विद्युत जोडणीची कामे सुरू होती. ती पूर्ण झाल्यासारखी वाटल्यानंतर दहा एप्रिलपासून हे मुख्यालय स्थलांतरित करण्याचा निर्णय आयुक्त आबासाहेब जऱ्हाड यांनी घेतला, पण तरीही या मुख्यालयाचे काम अद्याप अपूर्णच असल्याचे दिसून येते. अनेक ठिकाणी अंतर्गत दूरध्वनींची जोडणी अद्याप सुरू आहे, तर काही ठिकाणी एसी कंट्रोलर बसविण्यात न आल्याने अधिकारी गारठून जाण्याची वेळ आली आहे.
 १७० कोटी रुपये खर्चाची ही इमारत रस्त्यावर साफसफाई करणारे कामगार करताना दिसत आहेत. भिंतीचे कोपरे, काचा यांच्यावर धुळीचे थर साचलेले आहेत. प्रवेशद्वारावर साफसफाई करणारे एखादे मशिन फरशा घासताना दिसत असल्याचे चित्र आहे. जुन्या कार्यालयातील दस्तावेज पाहण्यासाठी योग्य ती व्यवस्था न केल्याने कर्मचारी खुच्र्याचा वापर ट्रॉली म्हणून करीत आहेत. त्यामुळे नवीन फरशांना खुच्र्याचे खूर लागून ओरखडे पडत आहेत.  अ‍ॅम्फी थिएटरचे काम अद्याप सुरू असून सुतार काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी त्याचा उकिरडा बनविला आहे. तेथील विद्युत जोडण्याचा तर अद्याप पत्ताच नाही. तिसऱ्या मजल्यावर गोवंडी आजही सिमेंट-रेती-खडीची कामे करीत असल्याने प्लॅस्टर न केलेल्या उघडय़ा भिंती आढळून येत आहेत.
प्रवेशद्वारावर कोणत्या मजल्यावर कोणते कार्यालय आहे याचा माहिती फलक नसल्याने कर्मचारी आणि अभ्यागत या इमारतीत हरवून जात आहेत. प्रवेशद्वारावरील काचेची तावदाने खुली असल्याने समोरच्या प्रशस्त छतातील मोकळ्या जागेला कबुतरांनी आपला आशियाना बनविण्यास सुरुवात केली आहे. त्यांची विष्ठा साफ करण्याची कोणतीही यंत्रणा नसल्याने पांढऱ्याशुभ्र इमारतींवर कबुतरांच्या कारनाम्याचे नमुने दिसू लागले आहेत. अनेक अधिकाऱ्यांची दालने दबंग अधिकाऱ्यांनी ढापली आहेत. त्यामुळे वरिष्ठांकडे तक्रार करण्याशिवाय त्या अधिकाऱ्यांना दुसरा पर्याय शिल्लक राहिलेला नाही.
महापौर व आयुक्त दालने तर तिसऱ्या मजल्यावरील अधिकाऱ्यांच्या दालनांपेक्षा छोटी असून महापौराचे दालन तर चावडीसारखे दरबार घेण्यासाठी तयार करण्यात आल्याचे दिसून येते.  सर्वसाधारणपणे दरवाजासमोर असणारी आयुक्तांची खुर्ची एका कोपऱ्यात ठेवण्यात आली आहे. याच दालनात असणारी त्यांची खासगी केबिन तर घुमटाचे खांब आणि त्रिकोन-चौकोनात विभागली गेली आहे. त्यामुळे आयुक्त या दालनावर नाखूश असल्याचे समजते. त्यांचा अधिकारी वर्ग दुसऱ्या तिसऱ्या मजल्यावर बसणार असल्याने या अधिकाऱ्यांना दिवसभर द्राविडी प्राणायाम करावा लागणार आहे. आलिशान बनविण्याच्या फंदात या शासकीय इमारतीचे नियम आणि संकेत पायदळी तुडवल्याचे सर्रास दिसून येत आहे. त्यामुळे इमारत तशी चांगली, पण वेशीला टांगली असे म्हणण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.