पालिकेच्या सेवेत असलेल्या नऊ हजार ५०० कंत्राटी कामगारांना कायम करण्याचा निर्णय नवी मुंबई पालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तातडीने घेतल्यानंतर आता सेवेत असणाऱ्या दोन हजार ३०० कर्मचाऱ्यांना दिवाळीचा सानुग्रह अनुदान देण्यासाठी विशेष महासभेचे आयोजन केले होते. स्थायी समितीने प्रस्तावित केल्याप्रमाणे कायम कर्मचाऱ्यांना १३ हजार ४०० रुपये तर ठोक कामगारांना ५ हजार ९०० रुपये दिवाळी सानुग्रह अनुदान सुचविले होते. त्यात महासभेने वाढ करत कायम कर्मचाऱ्यांना १४ हजार तर कंत्राटी कामगारांना ११ हजार सानुग्रह अनुदानाला मंजुरी दिली आहे. आचारसंहितेच्या भीतीपोटी पालिकेत सध्या महासभा आणि स्थायी समिती सभांचा सपाटा लावण्यात आला आहे.
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार संजीव नाईक यांना नवी मुंबईत सपाटून मार खावा लागला होता. नवी मुंबईतील बेलापूर आणि ऐरोली या दोन विधानसभा मतदारसंघांत ४९ हजारांचे मतधिक्य शिवसेनेचे उमेदवार विद्यमान खासदार राजन विचारे यांना मिळालेले आहे. त्यामुळे पालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा पालकमंत्री गणेश नाईक यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर मिळालेल्या प्रत्येक दिवसाच्या संधीचे सोने करताना शहरात अनेक विकासकामांच्या उद्घाटनाचा बार उडवून दिला जात असून प्रत्येक दिवस एक नवीन नागरी कामाचा शुभारंभ किंवा उद्घाटन केले जात आहे. प्रलंबित सर्व कामे विधानसभा आचारसंहिता लागण्यापूर्वी पूर्ण करण्याचा नाईक यांचा प्रयत्न असून तसे आदेश त्यांनी पालिका प्रशासनाला दिलेले आहेत. त्यामुळे पालिकेत मोठी ताकद असलेल्या कर्मचारी वर्गाला खूश करण्यासाठी कंत्राटी कामगारांना कायम करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेण्यात आला असून हा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी शासनाकडे पाठविण्यात आला आहे.
ही संख्या साडेनऊ हजार असल्याने त्यांच्या कुटुंबासह मोठी व्होट बँक मानली जात आहे. त्याचप्रमाणे दिवाळीत आचारसंहिता असल्याने कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान देताना येणारी अडचण लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला असल्याने, कायम कर्मचाऱ्यांसह कंत्राटी कामगारांना भरघोस सानुग्रह अनुदान पदरी पडले आहे. अनेक नागरी कामांना मंजुरी मिळावी यासाठी एक महिन्यात तीन महासभा तर त्याच्या दुप्पट स्थायी समिती सभा घेण्यात आल्या आहेत.