नवी मुंबई पालिकेच्या पाचव्या सार्वत्रिक निवडणुकीच्या तयारीला सर्व प्रमुख पक्षांनी सुरुवात केली असून १५ जानेवारीच्या मकर संक्रांतीनंतर हा वेग वाढणार आहे. दरम्यान सर्वसाधारणपणे एप्रिलच्या दुसऱ्या आठवडय़ात होणाऱ्या या निवडणुकीची प्रभाग रचना व प्रभाग आरक्षण पुढील आठवडय़ात वाशी येथील विष्णुदास भावे नाटय़गृहात होणार आहे. या वेळी ८९ प्रभागात आणखी २२ प्रभागांची भर पडली असून ऐरोली विधानसभा मतदारसंघात जास्त प्रभागसंख्या आहे.

नवी मुंबई पालिका काबीज करण्यासाठी सर्व पक्षांनी कंबर कसण्यास सुरुवात केली असून विद्यमान नगरसेवक जोरात कामाला लागले आहेत. आचारसंहिता लागण्यापूर्वी प्रभागातील नागरी कामे पूर्ण करण्यावर त्यांचा भर असून पेव्हर ब्लॉकसारख्या कामांसाठी प्रशासनाकडे आग्रह धरला जात आहे. माजी आयुक्त आबासाहेब जऱ्हाड यांनी या सोसायटीअंर्तगत होणाऱ्या कामांना पूर्णविराम दिला होता. ती कामे नवीन आयुक्तांनी सुरू करावीत यासाठी त्यांच्यावर दबाव टाकला जात आहे. पालिका प्रशासनाने ही कामे न केल्यास स्वखर्चाने ही कामे करण्याची काही नगरसेवकांनी तयारी दर्शवली आहे. या वेळची निवडणूक सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस आणि विरोधी पक्षातील काँग्रेस या दोघांना काठीण असल्याने या पक्षातील नगरसेवकांनी शिवसेना भाजपचा घरोबा शोधण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना शिवसेनेचा आधार वाटू लागला असून पक्षप्रवेश करण्यापेक्षा सेनेबरोबर आघाडी करण्यासंर्दभात चर्चा सुरू झाली आहे.
देशात अद्याप मोदी लाट कायम असल्याने भाजपला रेडीमेड उमेदवार मिळण्याची शक्यता अधिक निर्माण झाली आहे. नवी मुंबईतील अर्धी राष्ट्रवादी फुटण्याच्या तयारीत असल्याने भाजपचे जुनेजाणते इच्छुक उमेदवारांचे काय होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. मागील चार निवडणुकीत भाजपला उमेदवार मिळणे मुश्कील होत होते आणि आता भाजपला उमेदवारी कोणाला द्यायची असा प्रश्न पडणार आहे. बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्या हातात पक्षाची बऱ्यापैकी सूत्रे राहणार असली तरी त्यांच्या मदतीला राज्यातील पक्षाची सर्व यंत्रणा जुंपली जाणार आहे. भाजपच्या अनेक नेत्यांना औरंगाबाद आणि नवी मुंबईच्या पालिका निवडणुकींची जबाबदारी देण्यात आली आहे. काँग्रेसने हे सोपस्कर पूर्ण केले असून राष्ट्रवादी काँग्रेसची मदार गणेश नाईक यांच्यावर राहणार आहे पण त्यांनी इतर पक्षांची कास धरल्यास त्यांची जागा माथाडी नेते शशिकांत शिंदे आणि नरेंद्र पाटील हे घेणार आहेत.
पक्षाच्या बैठकींना न जाऊन नाईक यांनी संभ्रम वाढविला असून वेट अँड वॉचचा सूचक इशारा दिला आहे. काही शिवसैनिकांनी माजी जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवाव्यात यासाठी सानपाडा येथे बैठका घेतल्या आहेत. त्यामुळे मातोश्री याबाबत काय निर्णय घेते हे या महिन्याच्या अखेपर्यंत ठरणार आहे. प्रमुख पक्षांच्या यादीत शेवटच्या बाकावर बसणाऱ्या रिपब्ल्किन पक्षाने आपली व्यूहरचना जाहीर केली असून युतीमध्ये २८ जागांची मागणी केली आहे, तसे न झाल्यास स्वतंत्र लढण्याची तयारी ठेवली आहे. मनसेची कोणतीच हालचाल दिसून येत नाही. त्यामुळे निवडणुका लढवायच्या की नाहीत याबद्दल पक्षात संभ्रम आहे. अनेक पदाधिकारी पुढील काळात शिवसेना-भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा आहे. सर्व प्रमुख पक्षांच्या या तयारीबरोबरच प्रशासनाने आपली तयारी केली असून आजूबाजूच्या पालिकेतील पाच हजार कर्मचारी मागवले आहेत. त्याचबरोबर संगणकीय प्रभाग रचनेची माहिती निवडणूक आयोगाला पाठविण्यात आली असून पुढील आठवडय़ात प्रभाग रचना आणि आरक्षण जाहीर केले जाणार आहे.

नवी मुंबई पालिकेच्या सभागृहाची मुदत ८ मे रोजी समाप्त होत आहे. त्यामुळे त्यापूर्वी नवीन सभागृह अस्तित्वात येणार आहे. आयोगाच्या आदेशानुसार पालिका प्रशासनाने सर्व तयारी केली असून आरक्षणाची मशीन आणून ठेवली आहे. मागील आरक्षण २८ जानेवारी रोजी जाहीर झाले होते.
अमरिश पटनिगिरे,
उपायुक्त, नवी मुंबई पालिका