* उपचारांवरील खर्चाचा भार उचलणार
* टाटा रुग्णालयासोबत करार
* प्रति रुग्ण तीन लाख खर्चाची तयारी  
कॅन्सरसारख्या दुर्धर आजारावर निदान तसेच उपचार उपलब्ध व्हावेत यासाठी नवी मुंबई महापालिकेने कंबर कसली असून महापालिका हद्दीतील गरीब रुग्णांना कॅन्सरचे निदान करता यावे तसेच उपचाराचा आर्थिक भार हलका व्हावा, यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने मुंबईतील टाटा रुग्णालयाच्या सहकार्याने नवा प्रयोग राबविण्याचा निर्णय घेतला आहे. आधुनिक पायाभूत सुविधांनी युक्त असलेल्या नवी मुंबईत कॅन्सरवरील उपचारासाठी ठोस अशी शासकीय व्यवस्था उपलब्ध नाही. त्यामुळे कॅन्सरच्या निदानासाठी तसेच उपचारासाठी येथील रुग्णांना थेट टाटा रुग्णालय गाठावे लागते. गेल्या काही वर्षांपासून यावर उपाय शोधत असलेल्या येथील प्रशासकीय यंत्रणेने महापालिका रुग्णालयांमध्येच निदान तसेच उपचारासंबंधीचा वेगळा विभाग उभा करण्याचा निर्णय घेतला आहे. हे करत असताना टाटा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या नवी मुंबईतील आर्थिकदृष्टय़ा कमकुवत रुग्णाचा सुमारे तीन लाखांपर्यंतचा खर्च करण्याची योजनाही महापालिकेने आखली आहे. यासंबंधीचा सविस्तर प्रस्ताव तयार केला जात असून टाटा रुग्णालयासोबत प्राथमिक स्तरावर बोलणीही पूर्ण करण्यात आली आहेत.    
नवी मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने दुर्धर अशा आजारांवर परवडतील अशा दरात उपचार उपलब्ध व्हावेत, यासाठी गेल्या काही वर्षांपासून प्रयत्न सुरू केले आहेत. नवी मुंबईत कॅन्सरवरील उपचारांसाठी शासकीय रुग्णालयांमध्ये कोठेही उपचारांची सोय उपलब्ध नाही. वाशी गावातील भारत सेवाश्रम तसेच फादर अ‍ॅग्नेल मल्टिपरपज विद्यालयाच्या आवारात केमोथेरपी तसेच कॅन्सरवरील मोजक्या उपचारांच्या सुविधा उपलब्ध असल्या तरी गरीब रुग्णांना परवडेल, अशा दरात उपचाराच्या सुविधा या भागात फारशा नाहीत. विशेष म्हणजे, महापालिका रुग्णालयांमध्येही केमोथेरपी देण्याची ठोस अशी व्यवस्था नाही. त्यामुळे नवी मुंबईतील गरीब रुग्णांपुढे टाटा रुग्णालयाशिवाय दुसरा पर्याय नाही, अशी स्थिती आहे. पालकमंत्री गणेश नाईक यांनी यावर उपाय सुचवीत कॅन्सरवरील उपचारासाठी महापालिकेने पायाभूत सुविधा उपलब्ध कराव्यात, असे आदेश मध्यंतरी दिले होते. पालकमंत्र्यांच्या आदेशानुसार आयुक्त भास्कर वानखेडे आणि अतिरीक्त आयुक्त डॉ. संजय पत्तीवार यांनी कॅन्सर रुग्णांसाठी एक विशेष योजना आखली असून या योजनेचा अंतिम मसुदा येत्या सर्वसाधारण सभेपुढे सादर केला जाणार आहे.  
नवी योजना
महापालिकेने आखलेल्या नव्या योजनेनुसार महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये रुग्णांना तपासून स्तनाचा, गर्भाशयाचा तसेच मुखाच्या कर्करोगासंबंधीचे रुग्ण शोधून काढण्याची मोहीम राबविली जाणार आहे. तसेच संशयित रुग्णांना मुंबईतील टाटा रुग्णालयात संदर्भित करण्यात येणार असून त्यावरील सर्व प्रकारचा खर्च महापालिकेमार्फत केला जाणार आहे. कॅन्सर निदानासाठी आवश्यक असलेले मॅमोग्राफी, पॅप स्मिअर, बायोप्सी, कॉलोप्सी अशा प्रकारच्या महागडय़ा तपासण्यांचा खर्चही महापालिकेमार्फत केला जाणार आहे. एखाद्या रुग्णामध्ये कॅन्सरचे निदान झाल्यास त्याच्यावरील औषधोपचाराचा सुमारे तीन लाखांपर्यंतचा खर्च महापालिकेमार्फत केला जाणार आहे. नवी मुंबई महापालिका हद्दीत वास्तव्यास असणाऱ्या रुग्णांसाठी ही योजना कार्यान्वित केली जाणार आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त डॉ. संजय पत्तीवार यांनी दिली. याशिवाय टाटा रुग्णालयाच्या सहकार्याने महापालिकेतील डॉक्टरांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम राबविला जाईल, असेही पत्तीवार यांनी स्पष्ट केले.