केंद्र आणि राज्य सरकारचे अनेक पुरस्कार पटकाविणारी नवी मुंबई पालिका नगरविकास विभागाने नुकत्याच घेतलेल्या परीक्षेत मात्र नापास झाली असून यापूर्वी क वर्गात मोडणाऱ्या पालिकेला क वर्गातच ठेवण्यात आले आहे. लोकसंख्या, दरडोई उत्पन्न, दरडोई क्षेत्रफळ याचा निकष हे वर्ग ठरविताना लागत असले तरी पालिका प्रशासनाने ही परीक्षा पास होण्यासाठी योग्य अभ्यास केला नसल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. वरचा वर्ग न मिळणे म्हणजे केंद्र व राज्य सरकारकडून मिळणाऱ्या अनुदानावर गडांतर येण्यासारखे आहे.
राज्यातील २६ महानगरपालिकांची राज्य शासनाने नुकतीच वर्गवारी जाहीर केली. त्यात नवी मुंबई पालिकेला पूर्वीच्याच क वर्गात कायम ठेवण्यात आले असून शेजारच्या मुंबई पालिकेला अ प्लस हा विशेष दर्जा देण्यात आला आहे. याशिवाय पुणे व नागपूर पालिकांना ब मधून अ वर्गाची पदोन्नती देण्यात आली आहे. पिंपरी, नाशिक, ठाणे या पालिकांना ब वर्गवारी मिळाली आहे. राज्यातील चार पालिका या क वर्गात मोडणाऱ्या होत्या. त्या सर्व पास होऊन पुढे ब वर्गात गेल्या पण त्याच्याबरोबर असणारी नवी मुंबई पालिका क वर्गात कायम राहिली आहे. याशिवाय २२ महानगरपालिका ड वर्गात आहेत. सिडकोने नियोजनबद्ध शहर म्हणून वसविलेल्या शहरात ही पालिका असून यापूर्वी जलनियोजन, स्वच्छता, ईटीसी यांसारख्या प्रकल्पात या पालिकेला राज्य व केंद्र स्तरावरील पुरस्कार प्राप्त झाले आहेत. पालिकांना वर्ग देण्याचा निकष हा तेथील लोकसंख्येवर ठरविण्यात येतो. नवी मुंबई पालिकेची विद्यमान लोकसंख्या ही १५ लाखांच्या घरात असताना हा अभ्यास नगरविकास विभागापर्यंत पोहोचवण्यास पालिका प्रशासन अपयशी ठरल्याचे दिसून येते. सुपर सिटीचा टेंभा मिरविणाऱ्या नवी मुंबईला वरच्या वर्गात पास होता आलेले नाही. मुंबईला अनेक दृष्टीने नाके मुरडणाऱ्या राज्य शासनाने त्या पालिकेला अ प्लस हा विशेष दर्जा दिला आहे ही या ठिकाणी विशेष बाब आहे.