एनआरआय पोलीस ठाण्यात रेती चोरी आणि सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्य़ातील पाहिजे असलेला आरोपी म्हणून पोलीस नवी मुंबई महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेत्या सरोज पाटील यांचे पती आणि शिवसेनेचे बेलापूर येथील उपशहरप्रमुख रोहिदास पाटील यांचा शोध घेत आहेत. रेती चोरी प्रकरणात जप्त करण्यात आलेला ट्रक सोडविण्यासाठी दबाव टाकत जबरदस्तीने ट्रक घेऊन गेल्याप्रकरणी पनवेलचे नायब तहसीलदार सुहास खामकर यांनी पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात तक्रार नोंदवली आहे. खामकर यांच्या या कृतीने कायद्यासमोर सर्वच सारखे असल्याचा संदेश सर्वसामान्यांपर्यंत पोहचला आहे. आतापर्यंत याप्रकरणी पोलिसांनी ट्रकचालक आणि चालक सहाय्यकाला अटक केली. मात्र गेल्या आठ दिवसांत रोहिदास पाटील अद्याप पोलिसांच्या हाती लागले नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
उलवा खाडीतून बेकायदेशीर रेती चोरी उपसा सुरू असल्याची माहिती १२ मे रोजी नायाब तहसीलदार सुहास खामकर यांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे खामकर आणि त्यांचे पथक त्या ठिकाणी पोहचले. रेती चोरी करून घेऊन जात असलेले दोन ट्रक तरघर फाटा येथे त्यांनी जप्त केले. यात जवळपास आठ ब्रास रेती असल्याचे आढळून आले. याप्रकरणी ट्रकचालक रमेश कडवळे आणि चालक सहाय्यक मदन बनसोडे यांना ताब्यात घेण्यात आले. यावेळी शिवसेनेचे उपशहरप्रमुख रोहिदास पाटील हे त्या ठिकाणी आले होते. त्यातील एक ट्रक सोडण्यासाठी पाटील यांनी दबाव टाकला. तसेच तो ट्रक जबरदस्तीने घेऊन गेल्याचे तहसील कार्यालयातील एका अधिकाऱ्याने सांगितले. पाटील हे शिवसेनेच्या बेलापूर (आग्रोळी गाव) मधील नगरसेविका आणि विद्यमान विरोधी पक्षनेत्या सरोज पाटील यांचे पती आहेत. याचाच फायदा घेत पाटील यांनी नायब तहसीलदार आणि त्यांच्या अधिकाऱ्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला.
याप्रकरणी नायब तहसीलदार सुहास खामकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून रेती चोरीप्रकरणी आणि सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी चालक रमेश कडवळे आणि चालक सहाय्यक मदन बनसोडे आणि शिवसेनेचे उपशहरप्रमुख रोहिदास पाटील या तिघांच्या विरोधात एनआरआय पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कडवळे आणि बनसोडे या दोघांना पोलिसांनी अटक केली असून, पाहिजे असलेला आरोपी म्हणून रोहिदास पाटील यांचा शोध घेत असल्याचे एनआरआय पोलिसांनी सांगितले. महत्त्वाचे म्हणजे लोकसभा मतदान मोजणीच्या दिवशी केंद्रात उपस्थित असलेले आणि शिवसेनेचे उमेदवार राजन विचारे यांच्या विजयानंतर बेलापूरमध्ये विजयत्सोव साजरा करणारे पाटील पोलिसांच्या हाती कसे लागले नाहीत, हा सवाल उपस्थित केला जात आहे.

सदर रेती ही चोरीची नव्हती. उलवा येथील एका बांधकामाच्या साइटवरून ही रेती गावदेवी मंदिर येथे भराव टाकण्यासाठी आणण्यात येत असताना ट्रक पकडण्यात आला. ट्रक मालकाने केलेल्या विंनतीवरून मी त्या ठिकाणी गेलो होतो. सदर बाब अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर मी तेथून निघून आलो. यानंतर काय झाले हे मला माहीत नाही.
रोहिदास पाटील, उपशहरप्रमुख, शिवसेना</strong>

रोहिदास पाटील यांचा शोध सुरू आहे. त्यांना अटक करण्यासाठी पोलीस कर्मचारी त्यांच्या घरी गेले असता, ते मिळून आले नाहीत.
जितेंद्र सोनावणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, एनआरआय

त्या दिवशी पनवेल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गणेशपुरी, पारगाव आणि एनआरआय पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तरघर या ठिकाणी रेती चोरीवर कारवाई करण्यात आली. यात एका ठिकाणी ४३ ब्रास रेती, दोन सक्शन पंप आणि दोन जणांना ताब्यात घेण्यात आले, दुसऱ्या ठिकाणी १५० ब्रास रेती आणि रेतीने भरलेला एक ट्रक जप्त करण्यात आला. तरघर येथे जवळपास आठ ब्रास असलेले दोन रेतीने भरलेले ट्रक जप्त करण्यात आल्याची माहिती पनवेलचे नायब तहसीलदार सुहास खामकर यांनी दिली. दरम्यान तरघर येथे शिवसेनेचे रोहिदास पाटील त्या ठिकाणी आले. त्यातील एक ट्रक सोडण्यासाठी विनंती करत होते. यानंतर आणखी एका ठिकाणी कारवाईसाठी निघून आलो असताना पाटील यांनी त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांशी वाद घालत त्यातील एक ट्रक जबरदस्तीने घेऊन गेले. याप्रकरणी एनआरआय पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. तसेच पारगाव, गणेशपुरी येथील प्रकरणात पनवेल पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.