13 August 2020

News Flash

विमानतळ प्रकल्पग्रस्तांना बुधवारपासून निवाडा प्रत व भूखंड वितरण

नवी मुंबईतील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उभारणीत मैलाचा दगड ठरणाऱ्या बारा गावांतील प्रकल्पग्रस्तांच्या जमीन संपादन प्रक्रियेतील निवाडा

| June 2, 2015 07:04 am

नवी मुंबईतील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उभारणीत मैलाचा दगड ठरणाऱ्या बारा गावांतील प्रकल्पग्रस्तांच्या जमीन संपादन प्रक्रियेतील निवाडा प्रत (अ‍ॅवॉर्ड कॉपी) व साडेबावीस टक्क्य़ांचे प्रत्यक्ष भूखंड देण्यास बुधवारी ३ जूनपासून सुरुवात होणार आहे. या निवाडा प्रतसोबत सिडकोने दिलेल्या भूखंडाचे क्रमांकही दिले जाणार असल्याने विमानतळ प्रकल्पग्रस्त खऱ्या अर्थाने साडेबावीस टक्के योजनेतील भूखंडांचे मालक होणार आहेत. प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना साडेबावीस टक्के योजनेचे भूखंड प्रत्यक्षात देण्याची ही देशातील पहिलीच घटना आहे.
नवी मुंबई विमानतळ प्रकल्पाचे बिगूल गेली १८ वर्षे वाजत आहे. त्याला आता कुठे चालना प्राप्त झाली आहे. या विमानतळाला एकूण दोन हजार ६८ हेक्टर जमीन लागणार असून त्यातील ६७१ हेक्टर ही बारा गावांतील ग्रामस्थांची असून १५ हेक्टर जमिनीवर गावे आहेत. त्यामुळे त्यांना योग्य पुनर्वसन पॅकेज मिळाल्याशिवाय ते ही जमीन सोडण्यास तयार नव्हते. गतवर्षी या प्रकल्पग्रस्तांनी सिडकोच्या पॅकेजला हिरवा कंदील दर्शविला. त्यामुळे प्रकल्पाचे टेक ऑफ होण्याची शक्यता अधिक वाढली. त्यानंतर रायगड जिल्हाधिकारीअंर्तगत पनवेल तहसीलदार कार्यालयाची जमीन संपादनासाठी तारेवरची कसरत सुरू झाली. प्रकल्पातील शेतकऱ्यांना सोयीचे व्हावे म्हणून पनवेलमध्ये सिडकोच्या माध्यमातून विशेष मेट्रो सेंटर उभारण्यात आले. महत्त्वाकांक्षी आणि संवेदनशील प्रकल्पातील शेतकऱ्यांचे निवाडापत्र तयार करण्याची मोठी जोखीम या कार्यालयावर होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे ५ सप्टेंबपर्यंत प्रकल्पातील शेतकऱ्यांनी संमती दिल्याने सिडकोने साडेबावीस टक्के योजनेतील भूखंडांची सोडत काढण्यास सुरुवात केली. गेल्या वर्षी १५ ऑगस्टपासून एप्रिलपर्यंत चार वेळा सोडत काढून सिडकोने ९९५ खातेदारांचे भूखंड जाहीर केले, पण हे भूखंड देण्यासाठी जमिनींची निवाडा प्रत असणे आवश्यक होते.
गेले सात महिने पनवेल तहसीलदार कार्यालयातील प्रत्येक कर्मचारी डोळ्यात तेल घालून हे निवाडा प्रत तयार करण्याचे काम करीत होता. अखेर हे निवाडा प्रत तयार झाले असून बुधवारपासून त्याच्या वाटपाचा कार्यक्रम टप्प्याटप्प्याने सुरू होणार आहे. ३ जून रोजी सकाळी ११ वाजता वरचा ओवळा या गावाचे निवाडा प्रत वाटप सुरू करण्यात येणार असून या गावात सर्वाधिक म्हणजे ३०७ निवाडा प्रत आहेत. त्यानंतर पारगाव, पारगाव डुंगी, चिंचवली अशी टप्प्याटप्प्याने बारा गावे घेतली जाणार आहेत. प्रकल्पग्रस्तांना बरोबर निवाडा प्रत, भूखंड जाहीरपत्र, त्यांच्या जमिनीची ताबा अशी प्रक्रिया केली जाणार आहे. यासाठी १२ गावांतील प्रकल्पग्रस्त तसेच आजीमाजी लोकप्रतिनिधींना आमंत्रित करण्यात येणार आहे.
आमच्यासाठी आनंदाचा क्षण
देशातील एका महत्त्वाकांक्षी प्रकल्पातील शेतकऱ्यांना साडेबावीस टक्के योजनेसाठी
लागणारे निवाडा प्रत तसेच त्यासोबत भूखंड जाहीरपत्र देताना आम्हाला निश्चितच आनंद होत आहे. जमीन संपादन किंवा निवाडा प्रत देणे हे आमच्यासाठी नवीन नाही, पण या प्रकल्पाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले आहे. त्यामुळे तेथील निवाडा करताना आनंद वाटला. या कार्यक्रमाची सर्व तयारी करण्यात आली असून ५०-५० प्रकल्पग्रस्तांसाठी बूथ तयार करण्यात आलेले आहेत. या प्रकल्पातील खातेदार केवळ ९९५ असले तरी सहखातेदार खूप आहेत. त्यामुळे त्यांची सर्व काळजी घेण्यात आली आहे. प्रकल्पातील बारा गावे सुमारे १५ हेक्टर जमिनीवर वसलेली आहेत. त्यांना स्थलांतरासाठी १८ महिन्यांची मुदत देण्यात येणार आहे. त्यासाठी त्यांच्या संपादित जमिनीची ताबा पावती प्रथम घेतली जाणार आहे. येथील जमिनीचे भाव लक्षात घेता प्रकल्पग्रस्तांची फसवणूक होऊ नये यासाठी सर्वाची बायोमेट्रिक नोंद केली जाणार आहे.
रेवती गायकर, तहसीलदार, पनवेल

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 2, 2015 7:04 am

Web Title: navi mumbai news 8
Next Stories
1 नवी मुंबई, पनवेल, उरणमधील इमारती कोसळण्याचा धोका
2 पावसाळ्यातील मासेमारी बंदी लागू
3 तळोजा, नावडे वसाहतीत सुविधा, सुरक्षेचा बोजवारा
Just Now!
X