नवी मुंबई मपानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या भोंगळ कारभाराविरोधात दस्तुरखुद्द आयुक्त आबासाहेब जऱ्हाड यांनीच नाराजी व्यक्त केली आहे. शनिवारी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची तातडीने बैठक बोलावत आयुक्तांनी त्यांची चांगलीच खरडपट्टी काढली. त्याचबरोबर आरोग्य विभागाच्या कारभारात सुधारणा करण्याची आणि गतिमानता आणण्याची तंबी आयुक्तांनी दिल्याने अधिकाऱ्यांची भंबेरी उडाली आहे. 

महापालिकेच्या आरोग्यसेवेच्या उडालेल्या बोजवाऱ्यावर लोकसत्ताने प्रकाश टाकला होता. या वृत्ताची दखल घेत पालिका आयुक्त जऱ्हाड यांनी आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. यात त्यांनी आरोग्यसेवेच्या कामकाजाची माहिती अधिकाऱ्यांकडून घेतली. यावेळी त्यांनी आरोग्य विभागाच्या कामकाजावर जाहीर नाराजी व्यक्त केली. आरोग्य विभागातील उपस्थित अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली. विभागाच्या कामात गतिमानता आणण्यासाठीच्या सूचना यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या. आरोग्य विभागाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारीपदाच्या खुर्चीवर विराजमान होण्यासाठी अधिकाऱ्यांची संगीत खुर्ची नेहमीच सुरू असल्याचे नवी मुंबईकरांना पाहायला मिळाले. अनेक अधिकारी कित्येक वर्षांपासून मुख्यालयात ठाण मांडून बसलेले आहेत. नियमानुसार त्यांच्या पदाच्या कारभाराची सूत्रे हलविण्याची कर्तबगारी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दाखवून त्यांना मुख्यालयातच बसवले. यामुळे अनेक वर्षे मुख्यालयात ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांच्या इतर विभागात बदल्या करणे गरजेचे असल्याचे मत आरोग्य विभागातील कर्मचारी व्यक्त करीत आहेत. आरोग्य विभागातील काही अधिकारी सध्या वादात अडकले असून काहींचा वेळ न्यायालयात चकरा मारण्यात अधिक जात असल्याने आरोग्य विभागाच्या कारभाराचे तीनतेरा वाजले आहेत. बांधकाम पूर्ण झालेल्या महापालिकेची रुग्णालये अजून पूर्णपणे कार्यान्वित झालेली नाहीत. तुर्भे येथील माता बाल रुग्णालयातदेखील अनेक सुविधांचा वणवा आहे. फिरते रुग्णालय (मोबाइल व्हॅन) चुकीच्या नियोजनामुळे धूळ खात पडलेली आहे. वाशीतील संदर्भ रुग्णालयात आवश्यक लसींचा तुटवडा असल्याने रुग्णांचे हाल होत आहे. या सर्व परिस्थितीचा आयुक्त जऱ्हाड यांच्याकडून आढावा घेतला जाणार असल्याने अधिकाऱ्यांची धावपळ उडाली असून आयुक्तांच्या समोर आरोग्य विभागातील त्रुटी येऊ नये यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी फिल्डिंग लावली आहे.

अधिकाऱ्यांनी हेवेदावे बाजूला ठेवून काम करावे. आपण जनतेसाठी असून अधिकाऱ्यांनी फक्त पगार घेऊन घरी जाणे अपेक्षित नसून विभागाचे काम गतिमान करणे गरजेचे आहे. सर्व अधिकाऱ्यांना कामाला लावण्यात आले आहे. आरोग्य विभागातील सर्व कामांची प्रत्यक्षात पाहणी करून आढावा घेणार आहे.
आबासाहेब जऱ्हाड ,
आयुक्त , नवी मुंबई महानगरपालिका