कबड्डी खेळाडूप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी कशीबशी विजयी रेषा पार केली आहे, त्यामुळे या विजयाने हुरळून न जाता पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. मतदारांनी विकास आणि पारदर्शक कारभाराची अपेक्षा ठेवली आहे. त्यामुळे यापूर्वी झाले ते सर्व विसरून शहर विकासाच्या कामात सर्वानी एकत्र येण्याची गरज असल्याचे प्रतिपादन पालिका निवडणुकीतील विजयाचे सूत्रधार राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक यांनी वाशी येथे पक्षाच्या सभेत केले. पालिकेचा कारभार पारदर्शक व्हावा असे त्यांनी यावेळी नवनिर्वाचित नगरसेवकांना मार्गदर्शन करताना सांगितले. विधानसभा निवडणुकीत पिछाडीवर असलेले प्रभाग स्वत:च्या निवडणुकीत मात्र आघाडीवर आले असा टोलादेखील नाईक यांनी लगावला.
नवी मुंबई महापौर निवडणूक शनिवारी होणार असून राष्ट्रवादीच्या वतीने राष्ट्रवादीचे सहयोगी अपक्ष सदस्य सुधाकर सोनावणे यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज भरला. उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी नाईक यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची एक सभा वाशी येथील भावे नाटय़गृहात बोलावली होती.
पक्षाच्या ५७ पराभूत व ५४ विजयी उमेदवारांचे मनोधैर्य उंचावण्याच्या दृष्टीने नाईक यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. विधानसभा निवडणुकीत आघाडी सरकारने एकमेकांचे वस्त्रहरण केल्याने दोन्ही पक्षांचे नुकसान झाले.
पालिकेच्या सत्तेत काँग्रेसला सोबत घेण्यात आल्याने त्यांनी आता शहर विकासासाठी एकत्र यावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकांत नाईक यांच्या घराणेशाहीवर टीका झाल्याने त्यांनी यावेळी पालिका निवडणुकीत ‘कोअर’ कुटुंबात उमेदवारी देण्याचे टाळले. त्याचा फायदा पक्षाला झाला असून पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी या घराणेशाहीला दूर ठेवण्याच्या भूमिकेचे जाहीर कौतुक केले.
या मुद्दय़ाबरोबरच पालिकेतील भ्रष्टाचाराचा मुद्दा यावेळी कळीचा ठरला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालिकेतील कारभाराची चौकशी करण्याचे जाहीर केले आहे. सेना-भाजप युती, काँग्रेस या विरोधकांनी तो प्रचाराचा मुद्दा केला होता. त्यावर आपली भूमिका मांडताना नाईक यांनी पालिकेत यापुढे पारदर्शक कारभार करण्याची अपेक्षा व्यक्त केली. पालिकेतील कोणत्याही पदाधिकारी वा अधिकाऱ्याला भ्रष्टाचाराच्या मुद्यावर पाठीशी घातले जाणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली.