नेपाळमध्ये झालेल्या प्रलयंकारी भूकंपानंतर अख्खे जग सतर्क झाले आहे. नवी मुंबईतही भूकंप झाल्यास काय उपाययोजना करता येईल या विषयावर नवी मुंबई पोलिसांनी विद्यार्थ्यांना सुरक्षेचे धडे दिले. पोलिसांनी वाशी येथे आयोजित कार्यक्रमात भूकंपापासून बचावण्यासाठी करावयाच्या प्राथमिक उपाययोजनांची माहिती दिली.
शहरात भूकंप झाला, तर त्यापासून स्वत:चा बचाव कसा करता येईल या विषयावर जनजागृती करण्याच्या हेतूने नवी मुंबई पोलिसांनी कंबर कसली आहे. त्यासाठी वाशी येथील सेंट मेरीझ मल्टिपर्पज ज्युनिअर महाविद्यालय येथे शिबीर घेण्यात आले. यामध्ये ९०० विद्यार्थ्यांसह शिक्षक व पालक वर्गही उपस्थित होता.
या वेळी पॉवरपाइंटच्या साहाय्याने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. वाशी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, भूकंप झाल्यास तळमजल्यावरील नागरिकांनी मोकळय़ा मैदानाकडे धाव घ्यावी. जे पहिल्या, दुसऱ्या आणि त्यावरील असलेल्या मजल्यांवर राहत आहेत, त्यांनी विशेष खबरदारी घेतली पाहिजे.
पायऱ्या अथवा लिफ्टने खाली येण्याचा प्रयत्न करू नये, ते घातक ठरू शकते. त्यापेक्षा खांबाजवळ सुरक्षित उभे राहणे योग्य ठरेल, कारण भिंतीपेक्षा खांब मजबूत असतो. छतापेक्षा इमारतीची बाल्कनी सुरक्षेच्या दृष्टीने चांगला पर्याय होऊ शकतो. कोणत्याही इमारतीच्या खाली उभे न राहता मोकळय़ा जागी जाण्याचा सल्ला पोलिसांनी दिला.