सकाळच्या थंडीत मानवतावादी विचारांची आणि एकतेची शपथ घेत नवी मुंबईतील वाशी येथील शिवाजी चौकातून हजारो युवक, शालेय विद्यार्थी यांची एकता दौडमध्ये सहभागी होत एकात्मतेचा संदेश दिला. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांबरोबरच महापालिकेचे आधिकारी, पोलीस आणि विविध समाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनीदेखील एकता दौडमध्ये सहभाग नोंदवत सरदार वल्लभभाई पटेल यांना जंयती दिनी अभिवादन केले.
भारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या आदेशानुसार भारतभर सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवारी राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्यात आला. त्याअनुषंगाने राष्ट्रीय एकता दिनानिमित्त एकता, अखंडता, सुरक्षा व सुरक्षिततेची भावना नागरिकांमध्ये वृिद्धगत करणे हे उद्दिष्ट नजरेसमोर ठेऊन नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक वाशी येथून एकता दौडचे आयोजन करण्यात आले होते.  सरदार वल्लभभाई पटेल यांनी दिलेली अंखड सुरक्षितता आणि एकात्मतेचा संदेश या एकता दौडमधून देण्यात आला. नवी मुंबईच्या सर्वधर्मसमभावनेच्या शिकवणीत या एकता दौडने अधिकच भर टाकली. शालेय विद्यार्थी आणि महविद्यालीन विद्यार्थ्यांनी पटेल यांना अभिवादन करत एकता दौडमध्ये भारतमातेचा जागर केला. देशाची सहिष्णुता आणि एकात्मता वाढविण्यासाठी आपणही नेहमी कटिबद्ध राहू, अशी ग्वाही याप्रसंगी पालिका आयुक्त आबासाहेब जऱ्हाड यांनी दिली.