राज्य शासनाने शाळाबाह्य़ मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी मोहीम हाती घेतली असून, त्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाच्या वतीने शनिवारी करण्यात आलेल्या शाळाबाह्य़ बालक सर्वेक्षणामध्ये १०९७ बालके शाळाबाह्य़ असल्याचे निदर्शनास आले आहे. बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार २००९ नुसार ६ ते १४ वयोगटातील कोणतेही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये याकरिता महाराष्ट्र शासनाच्या निर्देशांनुसार महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण विभागाचे उपआयुक्त अमरीश पटनिगिरे यांच्या नियंत्रणाखाली शनिवारी सकाळी ७ ते सायंकाळी ७ पर्यंत महापालिका क्षेत्रात ठिकठिकाणी शाळाबाह्य़ बालकांच्या नोंदी करण्यात आल्या. यासाठी ४५५० पर्यवेक्षण आणि ११ क्षेत्रीय अधिकारी व ५ विशेष भरारी पथकांपर्यंत नियंत्रण ठेवण्यात आले. सर्वेक्षण करण्यात आलेल्या बालकांच्या डाव्या हाताच्या बोटाला शाई लावून ही नोंदणी करण्यात आली.
या सर्वेक्षणामध्ये ६ ते १४ वयोगटातील शाळेत कधीच न गेलेली ३०६ मुले व ३३१ मुली आढळून आल्या. त्याचप्रमाणे मध्येच शाळा सोडलेली २७६ मुले व १८४ मुली आढळल्या. अशाप्रकारे या सर्वेक्षणात एकूण ५८२ मुले व ५१५ मुली अशी एकूण १०९७ बालके शाळाबाह्य़ असल्याचे आढळून आले. यामध्ये ४९ मुले व ३९ मुली अशी ८८ अपंग बालके असल्याचे निदर्शनास आले. महाराष्ट्र शासनाच्या निर्देशांनसुार या शाळाबाह्य़ बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात सामावून घेतले जाऊन त्यांच्यासाठी शिक्षणाच्या माध्यमातून सर्वागीण विकासाची दारे खुली केली जाणार आहेत.