गणेशोत्सवापाठोपाठ आता सर्वाना नवरात्र उत्सवाचे वेध लागले असून यंदा ठाणे जिल्ह्य़ात एक हजार १३७ सार्वजनिक ८८७ घरगुती देवींच्या प्रतिमांची प्रतिष्ठापना गुरुवारी होणार आहे. ऐन विधानसभा निवडणुकांच्या काळात साजऱ्या होणाऱ्या नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने जिल्ह्यात सर्वत्र कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, दरवर्षीप्रमाणे यंदाही अष्टमी आणि नवमी या दोन दिवशी गरबा रसिकांना रात्री १२ वाजेपर्यंत दांडिया खेळण्याची मुभा देण्याचा निर्णय ठाणे शहर पोलिसांनी घेतला आहे.
येत्या १५ ऑक्टोबरला विधानसभेची निवडणूक होणार असल्याने आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. एरवी नवरात्र उत्सवातून प्रसिद्धी मिळत असल्याने अनेक राजकीय नेते फलकबाजीसाठी मंडळांना देणगी देतात. मात्र, यंदाच्या उत्सवावर निवडणुकीचे सावट असल्याने आचारसंहितेच्या भयाने अनेकांनी हात आखडते घेतले आहेत. त्यामुळे मंडळांपुढे मोठे आर्थिक संकट निर्माण झाले आहे. असे असले तरी यंदा ठाणे, भिवंडी, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, बदलापूर, अंबरनाथ परिसरांत ५९७ सार्वजनिक आणि ७३१ घरगुती देवी मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. तसेच देवीचे फोटो तसेच कलशाचे सार्वजनिक ८३ तर घरगुती १७९५ ठिकाणी पूजन करण्यात येणार आहे. चार ठिकाणी रावण दहन तर दोन ठिकाणी रामलीला होणार आहे. मीरारोड, गणेशपुरी, शहापूर, मुरबाड या जिल्ह्य़ातील ग्रामीण भागांत सार्वजनिक ५४० तर घरगुती १५६ देवी मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. देवींच्या फोटोंचे ३६८ सार्वजनिक ठिकाणी पूजन करण्यात येणार आहे. तसेच १६ सार्वजनिक तर २५४ घरगुती कलशाचे पूजन करण्यात येणार आहे. चार ठिकाणी रावण दहन होणार आहे. या आकडेवारीवरून शहराच्या तुलनेत ग्रामीण भागांत नवरात्रोत्सव मंडळांची संख्या जास्त आहे.
सुरक्षेच्या उपाययोजना
नवरात्र उत्सवाच्या पाश्र्वभूमीवर सर्वत्र कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला असून या उत्सवात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सर्वच मंडळांना सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे आदेश दिले आहेत. तसेच महिलांच्या छेडछाडीच्या प्रकारांना पायबंद घालण्यासाठी स्थानिक पोलीस ठाण्यांमार्फत विशेष पथके तयार केली आहेत, अशी माहिती ठाणे पोलीस दलातील एका वरिष्ठ  अधिकाऱ्याने दिली.