विदर्भात घरोघरी व सार्वजनिक मंडळात देवीच्या नवरात्र उत्सवाला उत्साहाच्या वातावरणात प्रारंभ झाला असून सर्व प्रथेप्रमाणे घरोघरी पूजा व आरती करण्यात आली. चितारओळीतून गुरुवारी सकाळी ढोल ताशांच्या निनादात दुर्गादेवीच्या मूर्ती नेऊन शहरातील विविध भागात प्रतिष्ठापना करण्यात आली.
विदर्भातील वेगवेगळ्या भागातील देवीच्या मंदिरात सकाळपासून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. मंदिरात नवरात्रोत्सवात पूर्वापार प्रथेप्रमाणे होणाऱ्या विधीमध्ये सहभागी होण्यासाठी व नवरात्र काळात देवीची उपासना करण्यासाठी अनेक महिला व पुरुष उपवास करतात. घरोघरी देवीचे नवरात्र सुरू झाले असून नऊ दिवस पांरपरिक पद्धतीने उत्सव साजरा केला जाणार आहे.
निसर्गाच्या ऋणाची उतराई करण्याच्या हेतूने साजरा होत असलेल्या या उत्सवात घटस्थापनेसाठी उपयोगात आणल्या जाणाऱ्या वस्तू शक्तिस्वरूप मानून उपयोगिल्या जातात. याचीच प्रचिती कोराडीसह विदर्भातील विविध देवी मंदिरात येते. आग्याराम देवी, कोराडीतील महालक्ष्मीचे मंदिर, पारडीतील भवानी देवी मंदिरात पहाटे पाच वाजेपासून नवरात्रच्या पहिल्या दिवशीच भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. चंद्रपूरमधील महाकाली, माहुरची रेणुका मंदिरात, अमरावतीच्या एकवीरा व अंबादेवी, खामगावजवळील घाटपुरी देवी मंदिरात, चिखलीची रेणुका व कौंडण्यपूरच्या अंबिका देवी मंदिरात नवरात्रोत्सवाला प्रारंभ करण्यात आला. सकाळी मंदिरात अभिषेक व आरत्यांनी मंदिराचा परिसर दुमदुमून गेला. नवरात्रोत्सवनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.
शहरातील देवी मंदिरावर आकर्षक रोषणाई करण्यात आली असून नऊ दिवस अखंड दीप, दुर्गासप्तशतीचे पाठ, नवचंडी, कुमारीपूजन, होमहवन, भजन कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. प्रतापनगर येथील दुर्गा मंदिरात, अयाचित मंदिरजवळी नवचंदी देऊळ, नंदनवन भागातील आदिशक्ती देवीचे मंदिर, सेंट्रल अ‍ॅव्हेन्यू येथील रेणुका माता व बडकस चौकातील महालक्ष्मी मंदिरात नवरात्रोत्सवातला प्रारंभ झाला. शहरातील अतिशय प्राचीन असे अयाचित मंदिरातही नवरात्र उत्सवानिमित्त दहा दिवस धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी विधिवत बालाजी आणि नवचंडिका देवीची पूजा करण्यात आली. अनेकांच्या घरी आजपासून बालाजीचे नवरात्र सुरू झाले आहे. आज सकाळी बाजारपेठेत पूजेचे साहित्य खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली होती. उज्ज्वलनगर, अभ्यंकर नगर, खामला, सदर, पाचपावली, सीताबर्डी, हनुमाननगर, रेशीमबाग, गोकुळपेठ, रामनगर आदी शहरातील विविध भागात विविध मंदिराच्या प्रतिकृती तयार करण्यात आल्या असून या ठिकाणी दुर्गादेवीची प्रतिष्ठापना करण्यात आली.