नवी मुंबईतील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रभावित क्षेत्राचा विकास सिडको गुजरातमधील टाऊनशिपच्या धर्तीवर करणार असून काही दिवसांपूर्वी गुजरात सरकारच्या वतीने एक सादरीकरण सिडको अधिकाऱ्यांना सादर करण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित न करता केवळ पायाभूत सुविधा व सार्वजनिक हितासाठी लागणारी जमीन घेतली जाणार आहे. या बदल्यात त्या शेतकऱ्यांना टीडीआर दिला जाणार आहे. प्राथमिक अंदाजानुसार या पायाभूत सुविधांवर सिडको साडेतीन हजार कोटी रुपये खर्च करण्यास तयार आहे.
राज्य शासनाने सिडकोला नुकतीच रायगड व ठाणे जिल्हय़ातील २७० गावांलगतच्या जमिनीचे नियोजन करण्याची जबाबदारी सोपविली आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रभावित क्षेत्र (नयना) असणाऱ्या या भागाच्या विकासासाठी सिडकोने कंबर कसली असून गुजरात राज्यात अनेक ठिकाणी वसविण्यात आलेल्या वसाहतीच्या धर्तीवर हा विकास करण्याचे ठरविले आहे.
या पॅटर्ननुसार शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्याची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट आहे. मात्र रस्ते, मलनि:सारण वाहिन्या, गटारे यांसारख्या पायाभूत सुविधा व शाळा, उद्यान, मैदाने यांसारख्या सार्वजनिक वापरासाठी लागणारी जमीन या शेतकऱ्यांकडून घेतली जाणार आहे. नयना क्षेत्रातील पहिल्या टप्प्यासाठी एक हजार हेक्टर जमिनीचा विकास केला जाणार असून त्यासाठी ढोबळ अंदाजपत्रक तयार केले जात आहे. यात पायाभूत सुविधांसाठी दहा टक्के, तर सार्वजनिक वापरासाठी पाच टक्के जमीन आरक्षित ठेवली जाणार आहे.
सिडकोचा नियोजन विभाग नयनाचा हा आराखडा तयार करीत आहे. गुजरातमध्ये अशा प्रकारे विकासकांना प्रोत्साहन देण्यात आले आहे. हा पॅटर्न राज्य सरकारही स्वीकारण्याच्या तयारीत असल्याचे समजते. जमीन संपादनाची प्रक्रिया आता किचकट व खर्चीक झाल्याने सिडको आता त्या फंदात न पडता लोकसहभागातून हे प्रकल्प राबविणार आहे.
 मोकळ्या जमिनीचा शोध घेणाऱ्या सिडकोला आता नयना क्षेत्राची ६०० चौ.कि.मी. जमीन उपलब्ध झाली आहे. त्यामुळे विमानतळाच्या आसपासच्या जमिनींचा नियोजनबद्ध विकास होण्यास मदत होणार आहे.

सिडको नयनाचा वेगळा पॅटर्न तयार करणार
गुजरातमधील वसाहतींचा आदर्श हा जरी आज देशभरात कौतुकाचा विषय झाला असला तरी सिडकोने हा पॅटर्न ३० वर्षांपूर्वीच सर्वप्रथम तयार केलेला आहे. औरंगाबादमध्ये हा पॅटर्न राबविण्यात आला असून सिडको नयना क्षेत्रासाठी स्वतंत्र असा ‘नयना पॅटर्न’ तयार करीत असल्याचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांनी स्पष्ट केले.