शासकीय अपंग प्रशिक्षण केंद्राच्या वसतिगृहातील निराधार व अपंग मुलांची गेल्या महिनाभरापासून होत असलेली हेळसांड शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनामुळे उजेडात आली. या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनीच लक्ष घालत या मुलांची या पुढे आणखी हेळसांड होऊ नये, या बाबत लक्ष घालण्याचा असा आदेश समाजकल्याणच्या अधिकाऱ्यांना दिला. समाजकल्याण अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर कार्यकर्त्यांनी आपले आंदोलन मागे घेतले.
रोज एक वेळचे जेवण, तेही खिचडीच्या स्वरूपात असे तब्बल महिनाभर सुरू असल्याच्या प्रकाराने शहरातील या वसतिगृहामधील निराधार व अपंग मुलांची मोठी हेळसांड होत होती. या मुलांना सकाळी दूध, दुपारी जेवण, संध्याकाळी फराळ व रात्री जेवण देण्यात येत असल्याबाबतचा फलक या वसतिगृहात लावण्यात आला आहे. परंतु प्रत्यक्षात गेला महिनाभर या मुलांना फक्त एक वेळचे भोजन, तेही तिखट खिचडीच्या स्वरूपात देण्यात येत होते. त्यामुळे या मुलांची पुरेशा आहाराविना मोठी परवड होत होती. या विरोधात आवाज उठविण्यासही ही मुले कचरत होती. परंतु राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना याची कुणकुण लागताच अभिजीत देशमुख यांच्या नेतृत्वाखाली या कार्यकर्त्यांनी शनिवारी सकाळी जिल्हाधिकाऱ्यांचे या प्रकरणी तक्रार करून लक्ष वेधले. त्यानंतर थेट वसतिगृहात धडक मारली. या वेळी तेथे असलेल्या अधिकाऱ्याच्या तोंडाला कार्यकर्त्यांनी पीठ फासले. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर समाजकल्याण अधिकारी श्रीमती सोनकांबळे यांनी या वसतिगृहात मुलांना पुरेसा व सकस आहार देण्यात येईल, असे आश्वासन या वेळी दिले. त्यानंतर कार्यकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले.