नगर ते कोल्हार या रस्त्याची अनेक कामे अपुर्ण असतानाही बेकायदा टोल वसुली केली जात असल्याने जनतेची लूट थांबवावी, अशी मागणी करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक कार्यकर्त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर आजपासून उपोषण सुरु केले.
टोल वसुलीचा प्रस्ताव सरकारकडे पाठवला आहे. तो मंजूर होताच टोल वसुली बंद केली जाईल, असे अश्वासन अध्यक्षक अभियंता हरीष पाटील यांनी दिले, मात्र गेल्या तीन वर्षांपासून ठेकेदार बेकायदा टोल वसुली करत असताना तीन महिन्यापुर्वी प्रस्ताव का पाठवला गेला व प्रत्यक्ष टोल बंदचा आदेश येईपर्यंत उपोषण सुरुच राहील, असे स्पष्ट करत शहर जिल्हा सरचिटणीस अभिजित खोसे व पदाधिकाऱ्यांनी आंदोलन सुरुच ठेवले. भुपेंद्र परदेशी, अंकुश चव्हाण, निलेश बांगरे, सुरेश बनसोडे, धिरज उकिर्डे, राजेंद्र देवळालीकर, हरीष शेळके, मुख्तार देशमुख, वैभव पोकळे, अनिल ढवण आदी उपोषणात सहभागी झाले आहेत. येथील कार्यालयाने नोव्हेंबरमध्ये पाठवलेला टोल बंदचा प्रस्ताव मुख्य अभियंत्यांनी २४ फेब्रवारीला सरकारकडे पाठवला आहे.
रस्त्याचा प्रकल्प ९९ कोटी रुपयांचा असताना ठेकेदाराने बँकेकडून १७५ कोटी रुपयांचे कर्ज घेतले, म्हणजेच करार करताना अधिकाऱ्यांनी योग्य जबाबदारी पार न पाडल्याने ठेकेदार अधिक टोल वसुली करणार आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत, टोल नाक्यांवर सुविधा नाहीत. बनावट पावत्या देऊन टोल वसुली केली जाते, निविदेतील शर्तीप्रमाणे रस्त्याचे काम झाले नाही. दुभाजकाला बेकायदा छेद दिल्याने होणाऱ्या अपघातास ठेकेदार व अधिकारी जबाबदार आहेत, त्यांच्यावर कारवी करावी, पाईपलाईन टाकण्यास ना हरकत नसतानाही हे काम कसे केले, याबद्दल कारवाई करावी, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.