राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचे आज लोकार्पण
राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचा लोकार्पण सोहळा काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत उपराजधानीत आयोजित करण्यात आला असून या सोहळ्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने बहिष्कार टाकून उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला आहे. आघाडीचा कार्यक्रम असताना काँग्रेसच्या नेत्यांनी ‘एकला चलो रे’ ही भूमिका घेतली असल्यामुळे त्याचा परिणाम आता आगामी लोकसभा आणि त्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये दिसून येईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जाहीरपणे बोलू लागले आहेत.
राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी असलेल्या राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचा शुभारंभ उपराजधानीत आयोजित करण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी होणाऱ्या या समारंभाला काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी उपस्थित राहणार असल्यामुळे काँग्रेसचे नेते जास्तीत जास्त गर्दी जमविण्यासाठी जिल्ह्य़ात दौरे करीत आहेत. ही योजना आघाडी सरकारची असली तरी हा कार्यक्रम ‘हायजॅक’ करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला डावलून निर्णय घेतले जात आहेत. गेल्या आठवडय़ात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नागपूर दौऱ्यात ही योजना राज्यभर राबविणार असल्याचे घोषित करून या कार्यक्रमाच्या शुभारंभाला सोनिया गांधी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते उपस्थित राहतील असे जाहीर केले होते. मात्र, प्रत्यक्षात राष्ट्रवादीच्या नेत्यांना विश्वास न घेता या कार्यक्रमासंबंधी निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. पालकमंत्री शिवाजीराव मोघे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना विश्वासात घेतले जात असल्याचे सांगितले, मात्र प्रत्यक्षात कुठल्याही स्थानिक पातळीवरील पक्षाच्या नेत्यांशी संवाद साधला नाही. या कार्यक्रमाच्या निमित्ताने काँग्रेसमध्ये लगबग वाढली असली तरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या गणेशपेठमधील कार्यालयात मात्र शुकशुकाट आहे. अन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख हे आघाडीमध्ये मंत्री असताना त्यांनाही पालकमंत्र्यांनी आयोजित केलेल्या बैठकीला बोलविण्यात आले नाही. शहरातील विविध भागात पोस्टर आणि होर्डिग लावले जात असताना केवळ सोनिया गांधींसह काँग्रेस नेत्यांचे छायाचित्र लावले जात आहे. शरद पवारांचे छायाचित्र कुठेही नाही. त्यामुळे या सर्व घडामोडीवर राष्ट्रवादी काँग्रेसने नाराजी व्यक्त करीत कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष अजय पाटील यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले, ज्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेची घोषणा केली त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही नेता त्या ठिकाणी नव्हता. हा आघाडीचा कार्यक्रम असल्याचे जाहीर केले जात असले तरी राष्ट्रवादी काँग्रेसला विश्वासात घेतले जात नाही. आमच्या नेत्यांना अजूनही आमंत्रणे देण्यात आलेली नाहीत. शहरात या कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेक बैठकी झाल्या असताना स्थाानिक पदाधिकाऱ्यांना बोलविण्यात आले नाही. काँग्रेसला आमची गरज नसेल त्यामुळे त्यांनी स्वबळावर हा कार्यक्रम आयोजित केला आहे. खासदार विलास मुत्तेमवार आणि पालकमंत्री शिवाजीराव मोघे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना बैठकीसाठी बोलविणे आवश्यक होते, मात्र त्यांनी जाणूनबूजून राष्ट्रवादी काँग्रेसला दूर ठेवले असा आरोप पाटील यांनी केला.
लोकसभा निवडणुका जवळ असताना मुत्तेमवार आणि मोघे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला अशा पद्धतीची वागणूक दिल्यामुळे त्याचे परिणाम त्यांना निवडणुकीत भोगावे लागतील, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दिला.