शहरातील वाहतूक सुसह्य करण्यास उपयुक्त ठरणाऱ्या मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर साकारलेला महाकाय उड्डाणपूल ही जणू केवळ राष्ट्रवादी काँग्रेसची निर्मिती आहे की काय, अशी कोणालाही शंका यावी या पद्धतीने पक्षाच्या झेंडे व ‘स्टिकर्स’ने अवघा उड्डाणपूल व्यापल्याचे पहावयास मिळाले. जिथे जागा मिळेल त्या ठिकाणी झेंडे व स्टिकर्स लावणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी वाहनधारकांना सावधानतेचा इशारा देणारे फलकही त्यासाठी सोडले नाहीत. त्यामुळेच उड्डाण पुल खुला होण्याच्या पहिल्या दिवसापासून त्याचे विद्रुपीकरणही सुरू झाल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.
महामार्गाच्या विस्तारीकरणातंर्गत पिंपळगाव-नाशिक-गोंदे टप्प्यात ६.१० किलोमीटरचा हा उड्डाणपूल साकारण्यात आला आहे.  सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नातून महामार्गाचे विस्तारीकरण पूर्णत्वास जात आहे. त्यातील हा उड्डाणपूल म्हणजे राजकीय लाभ उचलण्याचा हुकुमी एक्का ठरणार असल्याचे लक्षात घेऊन राष्ट्रवादीने या कामाच्या श्रेयाबाबत काँग्रेसला कोपऱ्यात ढकलले. हे दोन्ही पक्ष राज्यात सत्तेत असतानाही राष्ट्रवादीने या पुलाची निर्मिती ही केवळ एका पक्षाची असल्याचा आभास निर्माण करण्यात यश मिळविले आहे. लोकार्पण सोहळ्याचे औचित्य साधून केलेल्या वातावरण निर्मितीतून त्याची प्रचिती आली. कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येलाच राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते सक्रिय झाले होते. क. का. वाघ महाविद्यालयापासून ते मुंबई नाका आणि पुढे गरवारे पाँईंटपर्यंत असणाऱ्या उड्डाण पुलावर केवळ आणि केवळ राष्ट्रवादी काँग्रेसचे अस्तित्व राहील या पद्धतीने पक्षाचे झेंडे अन् स्टिकर्स लावण्यात आले होते. उड्डाण पुलाची उभारणी १७२ अवाढव्य खांबांवर झाली आहे. जवळपास प्रत्येक खांबावर राष्ट्रवादीचे ‘स्टीकर’ राहील याची दक्षता घेण्यात आली. उड्डाण पुलालगतच्या सव्‍‌र्हिस रोडचीही या विद्रुपीकरणातून सुटका झाली नाही. ठिकठिकाणी पक्षाचे झेंडे फडकावून लोकार्पण सोहळा राष्ट्रवादीमय होईल असा प्रयत्न केला गेला. लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने उड्डाणपूल चकचकीत झाला असताना राष्ट्रवादीने झेंडे व स्टिकर्सच्या माध्यमातून तो विद्रुप करण्यात हातभार लावल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त केली गेली. कार्यक्रमास राष्ट्रवादीचे प्रमुख नेते उपस्थित राहणार असल्याने स्थानिक पातळीवरील नेत्यांनी त्यांच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी फलक उभारले.
अनधिकृत फलकांवरून एरवी सर्वच राजकीय पक्षांना उपदेशाचे डोस पाजणाऱ्या राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांनीही या विद्रुपीकरणाकडे सोयीस्करपणे कानाडोळा केल्याचे पहावयास मिळाले. वास्तविक केंद्रीय भुपृष्ठ मंत्रालयाच्या अखत्यारीतील या राष्ट्रीय महामार्गाचे ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरीत करा’ या तत्वावर विस्तारीकरणाचे काम झाले आहे. त्यावरून मार्गस्थ होणाऱ्या वाहनधारकांना पुढील दोन दशके टोलचा बोजा सहन करावा लागणार आहे. असे असताना श्रेयाच्या स्पर्धेत राष्ट्रवादीने मित्रपक्ष काँग्रेसवर मात केल्याचे दिसून आले.