राज्य शासनाच्या निर्मलग्राम अभियानाची अंमलबजावणी प्रभावीपणे होण्यासाठी एकीकडे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. निशिगंधा माळी यांनी पायात चप्पल घालणे सोडून दिले असताना दुसरीकडे याच स्वच्छता अभियानाला आडकाठी निर्माण करण्याचा प्रयत्न सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा युवक अध्यक्षाने केल्याची बाब चव्हाटय़ावर आली आहे.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रामेश्वर मासाळ हे मंगळवेढा तालुक्यातील गोणेवाडी येथील रहिवासी. हे गाव यंदाच्या वर्षांसाठी निर्मलग्राम अभियान पुरस्कारासाठीच्या यादीत घेण्यात आले आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हा परिषदेचे ‘गुडमॉर्निंग पथक’ गावोगावी फिरत आहे. उघडय़ावर शौचास बसणाऱ्या मंडळींविरूध्द हे गुडमॉर्निग पथक खटले दाखल करीत आहे. गोणेवाडी येथे भल्या सकाळी हे पथक गेले असता त्या ठिकाणी काही गावकरी उघडय़ावर शौचास बसल्याचे आढळून आले. त्यामुळे कारवाईचा बडगा उगारला जात असतानाच जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष रामेश्वर मासाळ हे गावक-यांच्या बाजूने धावून आले. गुडमॉर्निग पथकातील कर्मचा-यांना मारहाणीची व पुन्हा गावात याल तर वाहने जाळून टाकण्याची धमकी देत या पथकाला कारवाई करू न देता गावातून पिटाळून लावले. याबाबतचे पत्र मंगळवेढा तालुका पंचायत समितीच्या गट विकास अधिका-यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिका-यांना पत्र पाठवून गुडमॉर्निग पथकाला काम करणे कठीण झाल्याची अडचण मांडली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम कासार यांनी ही बाब जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. निशिगंधा माळी यांच्या कानावर घातली.
जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची एकहाती सत्ता असून डॉ. निशिगंधा माळी या राष्ट्रवादीच्याच आहेत. निर्मलग्राम अभियान यशस्वी होण्यासाठी त्यांनी जातीने लक्ष घालून संपूर्ण जिल्हा निर्मलग्राम होईपर्यंत पायात चप्पल घालणार नाही, असा पण त्यांनी केला आहे. निर्मलग्रामसाठी त्यांनी ध्यास घेतला असताना त्यांच्या राष्ट्रवादीचे जिल्हा युवक अध्यक्ष रामेश्वर मासाळ यांनी निर्मलग्राम अभियानाला खो घातल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. मासाळ यांच्या कृतीनर डॉ. माळी यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. यासंदर्भात पक्षश्रेष्ठींसह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे लेखी तक्रार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
रामेश्वर मासाळ हे यापूर्वी सलग चार वर्षे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री राहिलेले प्रा. लक्ष्मण ढोबळे यांचे कट्टर अनुयायी समजले जातात. प्रा. ढोबळे यांच्याच शिफारशीने मासाळ यांची वर्णी जिल्हाध्यक्षपदावर लागली होती. परंतु याच मासाळ यांनी निर्मलग्राम अभियानाच्या अंमलबजावणीला विरोध केल्याने हा चर्चेचा विषय बनला आहे.
यासंदर्भात मासाळ यांचे म्हणणे असे की, एकीकडे निर्मलग्राम अभियान चालविले जात असले तरी दुसरीकडे मंगळवेढा तालुक्यात बऱ्याच गावांमध्ये आजही पाण्याची टंचाई भेडसावत आहे. गोणेवाडी येथे पिण्यासाठीही पाणी मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी होत असताना शौचालयासाठी पाणी कोठून आणायचे, हा प्रश्न आहे. पाणीच नसेल तर निर्मलग्राम अभियान यशस्वी कसे होणार, असा सवाल उपस्थित करीत मासाळ यांनी स्थानिक गावक-यांची अडचण मांडली.