राष्ट्रवादी काँग्रेसने आज राष्ट्रवादी भवनमध्ये आयोजित केलेल्या, जिल्हा परिषद सदस्यांच्या तातडीच्या बैठकीत, जि. प. अध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांच्या कार्यपद्धतीबद्दल आक्षेप घेतले तर मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांच्या कामकाजाबद्दल तीव्र स्वरुपाची नाराजी व्यक्त केली. पक्षाचे जिल्हाध्यक्ष घनश्याम शेलार यांनी स्वत:ही जि. प.मध्ये सत्ता येऊनही जिल्ह्य़ात पक्षाला काय फायदा झाला, असा प्रश्न उपस्थित केला.
मुख्य कार्यकारी अधिकारी अग्रवाल यांनी कामकाजात सुधारणा करावी यासाठी आपण त्यांच्याशी पदाधिकाऱ्यासमवेत चर्चा करू असे लंघे यांनी, तर या बैठकीतील अहवाल आपण उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांना सादर करू, असे जिल्हाध्यक्ष शेलार यांनी पत्रकारांना सांगितले. आपण किंवा इतर पदाधिकारी यांच्याबद्दल सदस्यांनी नाराजीचा सूर काढला याचा लंघे यांनी मात्र इन्कार केला. सीईओ सदस्यांशी व्यवस्थित बोलत नाहीत अशी तक्रार असल्याचे आपण यापूर्वी त्यांच्या निदर्शनास आणले होते, याकडे लंघे यांनी लक्ष वेधले. मिळालेल्या माहितीनुसार शिक्षण विभाग व समाजकल्याण विभागाच्या कामाबद्दल काही सदस्यांनी नाराजी व्यक्त केल्याचे समजले.
सहा महिन्यांपूर्वी तत्कालीन पालकमंत्री बबनराव पाचपुते यांच्या उपस्थितीत अशीच पक्षाच्या जि. प. सदस्यांची आढावा बैठक झाली होती. परवा (गुरुवारी) नवे पालकमंत्री मधुकर पिचड जि. प.मध्ये सर्वपक्षीय आढावा बैठक घेणार होते. मात्र ती आज ऐनवेळी रद्द झाली. आता ती पुढील आठवडय़ात होईल, असे समजले. परंतु काल शेलार यांनी तातडीने सदस्यांना निरोप देत आज पक्ष कार्यालयात बैठक आयोजित केली. उद्या (बुधवारी) प्रदेशाध्यक्ष जाधव यांनी मुंबईत सर्व जिल्हाध्यक्षांची बैठक आयोजित केली आहे, त्याची पाश्र्वभूमीही सदस्यांच्या बैठकीस आहे. शेलार यांनी त्यानंतर सर्व तालुकाध्यक्ष व प्रमुख पदाधिकाऱ्यांची चर्चा केली.
दर महिन्याला जि. प. सदस्यांशी चर्चा करण्याचा प्रयत्न होता, परंतु काही महिने ते शक्य झाले नाही, त्यामुळे आज बैठक घेतली, असे स्पष्टीकरण शेलार यांनी दिले. बैठकीस लंघे यांच्यासह उपाध्यक्ष मोनिका राजळे, गटनेते शरद नवले आदी उपस्थित होते. अनुपस्थित सदस्यांना नोटिसा काढल्या जाणार असल्याचे शेलार यांनी सांगितले. सीईओ अग्रवाल यांच्या कामाबद्दल सदस्यांनी तीव्र भावना व्यक्त केल्याचे शेलार यांनी मान्य केले.
लंघे यांच्याबद्दल कामे मार्गी लागत नाहीत, अशी सदस्यांची प्रमुख तक्रार होती. आपल्या शिफारशी नेवासे पंचायत समितीत परस्पर कोणामुळे बदलल्या जातात, असा रागही एका सदस्याने त्यांच्याबद्दल व्यक्त केला. पदाधिका-यांचा वचक नसल्याने जि. प.मध्ये केवळ ‘अधिकारी राज’ सुरु आहे, अधिकारी अनेक वेळा पदाधिकाऱ्यांनाही जुमानत नाहीत तर सदस्यांना काय किंमत देत असतील असा आक्षेपही घेण्यात आला. अग्रवाल कार्यालयात उपस्थित राहात नाहीत, अधिकाऱ्यांना निवासस्थानी बोलावून घेऊन कामकाज करतात, ज्येष्ठ सदस्य व पदाधिकाऱ्यांना सन्मानाची वागणूक देत नाहीत, त्या अधिक काळ येथे राहिल्यास मतदारसंघात तोंड दाखवणे मुश्कील होईल, अशी भावना व्यक्त करताना काही सदस्यांनी राजीनामा देण्याचाही इशारा दिला.