राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष बाबासाहेब गाडे पाटील आणि त्यांचे बंधू व यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष डॉ. चंद्रकांत गाडे पाटील यांनी राष्ट्रवादीचा त्याग करून भाजपत प्रवेश घेण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे. येत्या दोन-चार दिवसात त्यांच्या भाजप प्रवेशाची अधिकृत घोषणा होण्याच्या वृत्ताला डॉ. चंद्रकांत गाडे पाटील यांनी दुजोर दिला आहे.
बाबासाहेब गाडे पाटील यांनी २००९ च्या विधानसभा निवडणुकीतही बंडखोरी करून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. यावेळची पोटनिवडणूकही लढण्याची त्यांनी तयारी केली होती. मात्र, उमेदवारी अर्ज दाखल केल्यास पक्षातून त्यांची हकालपट्टी करण्याचा इशारा राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी दिला होता. राष्ट्रवादीत भविष्य नाही आणि स्वाभिमानी कार्यकर्त्यांची कदर नाही म्हणून राष्ट्रवादीचा त्याग करून गाडे पाटील बंधू भाजपमध्ये जाणार असल्याचे त्यांचे निकटवर्ती सांगतात. गाडे पाटील बंधूंच्या भाजप प्रवेशामुळे भाजपचे उमेदवार मदन येरावार यांचे पारडे जड होणार असल्याचे चित्र आहे.
दरम्यान, काँग्रेसच्या नंदिनी पारवेकर यांनी बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल केला तेव्हा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बहिष्कार टाकून काँग्रेसबद्दल असलेली नाराजी व्यक्त केली. अन्न व औषध प्रशासनमंत्री मनोहर नाईक, प्रवीण देशमुख आणि आमदार संदीप बाजोरिया यांच्यासह कोणताही मोठा नेता, कार्यकर्ते यावेळी उपस्थित नव्हते. प्रत्यक्ष मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्याशिवाय आणि आमचे म्हणणे ऐकून घेतल्याशिवाय नंदिनी पारवेकरांच्या प्रचारात आम्ही सक्रिय राहणार नाही, असे स्पष्ट प्रतिपादन राष्ट्रवादीचे आमदार संदीप बाजोरिया यांनी केले आहे. काँग्रेसच्या कोणत्याही स्थानिक नेत्यांवर आमचा विश्वास नाही. नंदिनी पारवेकरांना आमचा विरोध नाही. त्यांना निवडून आणण्याची आमची जबाबदारी आहे. ती आम्ही पार पाडूच. मात्र, त्यापूर्वी मुख्यमंत्री चव्हाण यांच्याशी आमची भेट आणि चर्चा होणे जरुरीचे आहे.    भाजपसारख्या   पक्षाशी आम्ही हातमिळवणी करणार नाही, असेही आमदार बाजोरिया यांनी स्पष्ट केले.