मराठवाडय़ातील पाणीप्रश्न गंभीर आहे. नगर व नाशिक जिल्ह्य़ातून जायकवाडी धरणात १० टीएमसी पाणी सोडावे, ही मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी मराठवाडय़ातील चारही मंत्र्यांसमवेत स्वत: भेटून मध्यस्थी करू, असे राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. येथे शुक्रवारी आयोजित केलेल्या राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या विभागीय मेळाव्यात आव्हाड बोलत होते.
पाणीप्रश्नाबाबत मराठवाडय़ातील जनतेच्या तीव्र भावना आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस जनभावना लक्षात घेणारा पक्ष आहे. सकाळपासून मराठवाडय़ातील जेवढे आमदार व मंत्र्यांशी चर्चा केली, त्या सर्वानी पाणीप्रश्नाचे गांभीर्य लक्षात आणून दिले. त्यामुळे हा प्रश्न खासदार सुप्रिया सुळे यांच्यासमवेत शरद पवार यांच्याकडे मांडला जाईल, असे आव्हाड म्हणाले.
कार्यक्रमानंतर पत्रकार बैठकीतही आव्हाड यांनी याचा पुनरुच्चार केला. राष्ट्रवादी काँग्रेस पाणीप्रश्नी दुटप्पी भूमिका घेत आहे काय? नगर जिल्ह्य़ातील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शंकरराव कोल्हे मराठवाडय़ाला पाणी देऊ नये यासाठी प्रयत्न करतात. त्याचे काय, असे विचारले असता आव्हाड यांनी राज्य म्हणून या समस्येकडे पाहण्याची गरज असल्याचे सांगितले. प्रत्येकजण आपल्या जिल्ह्य़ापुरता, विभागापुरता विचार करत आहे. राज्याचा समग्र विचार करून या अनुषंगाने निर्णय घ्यावा लागेल. मात्र, मराठवाडय़ात तीव्र भावना असल्याचे लक्षात आले आहे. त्यामुळे तो प्रश्न वरिष्ठ नेत्याला सांगितला जाईल.
राष्ट्रवादी काँग्रेस युवती मेळाव्यात पाणीप्रश्नावरून काही युवतींनी थेट खासदार सुळे यांना प्रश्न विचारला. पक्षाची भूमिका काय, असे थेट विचारल्याने आव्हाड यांनी उत्तर दिले. शहरातील पाणी समस्येवरही प्रश्न उपस्थित करण्यात आला. त्यावर आव्हाड म्हणाले की, औरंगाबाद महापालिकेत सत्ता कोणाची आहे? प्रश्न सोडवून घ्यायचे असतील तर आंदोलन करायलाही शिकले पाहिजे. सत्ताधारी पक्षाचा आमदार असलो तरी सामान्य माणसाच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरा, असा सल्ला द्यायला कचरत नाही, असेही त्यांनी सांगितले.