औरंगाबादेत विधी विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणा ४ वर्षांपूर्वी झाली. मात्र, अजूनही हे विद्यापीठ सुरू झाले नाही. हा प्रश्न आता मराठवाडय़ातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी हाती घेतला आहे. याआधारे काँग्रेसवर कुरघोडी करता येईल का, याची चाचपणी केली जात आहे.
विधी अभ्यासक्रमात गुणवत्तापूर्ण मनुष्यबळ निर्माण व्हावे, या साठी हे विद्यापीठ स्थापन करण्याची मागणी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याकडे करण्यात आली होती. विद्यापीठ स्थापनेचा निर्णय झाला, पण त्याची अंमलबजावणी होऊ शकली नाही. मंत्री राजेश टोपे यांच्यासह पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आमदार विक्रम काळे, डॉ. कल्याण काळे व एम. एम. शेख यांनीही ही मागणी रेटून धरली. येत्या शैक्षणिक वर्षांत हे विद्यापीठ सुरू न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा आमदार चव्हाण यांनी दिला.
दि. १ जानेवारीपर्यंत विधी विद्यापीठ स्थापनेचा अधिकृत निर्णय जाहीर करावा, तसेच त्याची तातडीने अंमलबजावणी करावी, अशी मागणी करण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी या मागणीचा सकारात्मक विचार करणार असल्याचे शिष्टमंडळाला सांगितले.