सचिन अहिर यांच्याकडे पुन्हा एकदा मुंबईची जबाबदारी सोपवून राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षाची ताकद वाढविण्यावर भर दिला असला, तरी यापूर्वी दोनदा अध्यक्षपद भूषविताना अहिर यांच्याकडून फार काही चांगली कामगिरी झाली नव्हती. या पाश्र्वभूमीवर पक्षाला उभारी देण्याचे मोठे आव्हान अहिर यांच्यापुढे आहे.
गेल्या १६ वर्षांत राज्यात सर्वत्र राष्ट्रवादीने हातपाय पसरले असले, तरी मुंबई आणि विदर्भात पक्ष कमकुवतच राहिला आहे. आतापर्यंत महापालिकेच्या तीन निवडणुका राष्ट्रवादीने मुंबईत लढविल्या, पण जेमतेम दुहेरी आकडा गाठणे शक्य झाले. गेल्या विधानसभा निवडणुका स्वबळावर लढविताना मुंबईतील ३६ पैकी एकाही जागेवर राष्ट्रवादीला यश मिळाले नाही. मुंबईत पक्ष वाढीसाठी मराठी मतदारांबरोबरच झोपडपट्टीधारक, अल्पसंख्याक तसेच बिगर मराठी यांची मोट बांधावी लागते. नेमके यात राष्ट्रवादीला अजूनही यश मिळालेले नाही. राष्ट्रवादीने मुंबईत अनेक प्रयोग करून बघितले, पण पक्ष कधीच वाढला नाही. गटातटाच्या राजकारणात परस्परांचे पत्ते कापण्यालाच काही नेत्यांनी प्राधान्य दिल्याची टीका केली जाते.
मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर अध्यक्षपद कोणाकडे सोपवायचे या निर्णय प्रक्रियेत स्वत: पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी लक्ष घातले होते. पक्षाच्या सर्व स्थानिक नेत्यांशी चर्चा केली होती. त्यानंतरच सचिन अहिर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. अहिर किंवा नवाब मलिक हे दोन पर्याय पक्षापुढे होते, पण अहिर यांनाच संधी देण्यात आली. अहिर यांनी यापूर्वी सहा वर्षे अध्यक्षपद भूषविले आहे, पण या काळात मुंबईत पक्ष बांधणीत त्यांना फार काही यश आले नव्हते. आता पुन्हा त्यांच्याकडेच अध्यक्षपद सोपवून नेतृत्वाने त्यांच्याकडून चांगल्या यशाची अपेक्षा केली आहे. पक्ष वाढीसाठी मुंबईत नव्या चेहऱ्याची गरज होती, असा पक्षाच्या स्थानिक नेत्यांचा मतप्रवाह आहे. मात्र अहिर यांचा अनुभव लक्षात घेऊनच त्यांच्याकडे ही जबाबदारी सोपविण्यात आल्याचे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितले.
मुंबईत संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. निरुपम यांनी महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना आणि भाजपच्या विरोधात आवाज उठविला आहे. महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचे सूतोवाच अहिर यांनी केले आहे. या पाश्र्वभूमीवर अहिर यांना पक्ष वाढविण्याकरिता विविध मुद्दे हाती घेऊन प्रयत्न करावे लागणार आहेत.