News Flash

लोकांचे प्रश्न घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर

लोकसभा निवडणुकीत ठाणे मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार संजीव नाईक यांना मतदाराने घरचा रस्ता दाखविल्यानंतर आता जनतेचे प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरण्याचे नवी मुंबईतील राष्ट्रवादीने ठरविले आहे.

| May 30, 2014 03:09 am

लोकसभा निवडणुकीत ठाणे मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार संजीव नाईक यांना मतदाराने घरचा रस्ता दाखविल्यानंतर आता जनतेचे प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरण्याचे नवी मुंबईतील राष्ट्रवादीने ठरविले आहे.  २ जून रोजी प्रकल्पग्रस्त, झोपडीग्रस्त आणि एफएसआयग्रस्त नागरिकांचे प्रश्न घेऊन सिडकोवर भव्य मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. पालकमंत्री गणेश नाईक हे राज्य सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री असल्याने ते या मोर्चात सहभागी होणार नाहीत पण त्यांचे दोन चिरंजीव माजी खासदार संजीव नाईक आणि आमदार संदीप नाईक या मोर्चाचे नेतृत्व करणार आहेत.
 प्रकल्पग्रस्तांच्या एका दुसऱ्या संघटनेने १० जून रोजी दुसरा मोर्चा काढला आहे. इकडे आमदार नाईक यांनी सिडकोवर मोर्चाचे आयोजन केले आहे तर तिकडे दुसरे आमदार नरेंद्र पाटील यांनी माथाडय़ांच्या प्रश्नावर आमदारकी पणाला लावली आहे. त्यामुळे नवी मुंबईत ऐन विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले आहे.
दोन हजारनंतर सिडकोला स्वतंत्र निर्णय घेण्याचे अधिकार राहिले नसल्याने छोटय़ा मोठय़ा निर्णय शासनाकडे पाठविला जात आहे.  शासनाकडे सिडकोचे अनेक धोरणात्मक विषय मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यात प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेली घरे कायम करणे (ही घरे चव्हाण सरकारने जानेवारी २०१० रोजी कायम केली आहेत पण त्यात गावकुसाची सीमा निश्चित करण्यात आली आहे. ती काढून टाकण्याचे काम या सरकारला करावे लागणार आहे.), वाशीतील जेएनवनजेएनटुसारख्या मोडकळीस आलेल्या इमारतींना अडीच एफएसआय देणे आणि झोपडपट्टय़ांच्या विकासासाठी चार एफएसआयची मागणी आहे. यात गावांना चार एफएसआयची मागणी क्लस्टर योजनेमुळे पूर्ण झाली आहे. गावठाणात समूह विकास योजनेविषयी विरोधकांनी अपप्रचार केल्याने  प्रकल्पग्रस्तांची एकगठ्ठा मते नाईकांच्या विरोधात गेल्याचे चित्र आहे.  
झोपडपट्टीतील रहिवाशांना दाखविण्यात आलेले पुनर्विकासाचे गाजर पूर्ण न झाल्याने तसेच वाढीव एफएसआयचा प्रश्न अधांतरी असल्याने नाईकांना नवी मुंबईत ४८ हजार मतांचा फटका बसला असे दिसून येते. महायुतीचे उमेदवार विचारे यांना नवी मुंबईतून ४८ हजारांचे मताधिक्य मिळाले असले तरी नाईकांना हा फटका लाखभर मतांचा आहे.
सिडकोवर काढण्यात येणारा मोर्चा सकाळी नऊ वाजता बेलापूर खिंडीजवळून निघणार असून या मोच्र्याला ५० हजार नागरिक उपस्थित राहणार असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे पोलिसांची जबाबदारी वाढली आहे. यापूर्वी मंत्री नाईक यांनी जून १९९४ आणि नोव्हेंबर १९९९ रोजी असे मोर्च काढलेले होते. चिरंजीवांच्या नेतृत्वाखालचा हा पहिलाच मोर्चा आहे. लोकांच्या प्रश्नांवर आंदोलन करायचे नाही का, असा उलट सवाल आमदार संदीप नाईक यांनी उपस्थित केला आहे. मोडकळीस आलेल्या इमारतींना वाढीव एफएसआय देण्यात यावा ही मागणी गेली वीस वर्षे केली जात आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्याकडे या विषयावर बैठक लावण्यात आली होती पण त्यानंतरही हा विषय सुटलेला नाही. सिडकोची फसवणूक, शासनाचे दुर्लक्ष आणि लोकांच्या प्रश्नावर लोकशाहीत मोर्चा काढणे आयोग्य कसे काय, मोडकळीस आलेल्या इमारतींतील रहिवाशी जीव मुठीत घेऊन जगत आहेत पण सिडकोला या विषयावर राजकारण करीत बसायचे आहे. पालिका या शहरातील नियोजन प्राधिकरण आहे. त्यामुळे या इमारतींना किती एफएसआय हवा याचा प्रस्ताव सर्व अहवालासह पाठविण्यात आला आहे. पालिकेने हे सोपस्कर पूर्ण करूनही वाढीव एफएसआय मिळणार नसेल तर मोर्चा काढण्याशिवाय दुसरा कोणता पर्याय आहे.
पालिकेची मागणी पूर्ण करण्यासाठी सहकार्य करण्याऐवजी सिडकोने तीन एफएसआयचे भूत तयार करून फाटे फोडले आहेत. काँग्रेसने घेतलेल्या या आडमुठेपणाचा फटका आम्हालाही बसला आहे. सुक्याबरोबर ओलेही जळले आहे. आमचा खासदार निवडून आला असता तरी आमची हीच भूमिका राहिली असती, असे आमदार नाईक यांनी आत्ताच या आंदोलनाची स्टंटबाजी का या प्रश्नावर स्पष्ट केले. राष्ट्रवादीच्या एका आमदाराने मोच्र्याचे आयोजन केले आहे तर शहरातील दुसरे राष्ट्रवादीचे विधानपरिषद आमदार नरेंद्र पाटील यांनी माथाडींच्या प्रश्नावर आमदारकी पणाला लावण्याचा इशारा दिला आहे. ही एकतऱ्हेने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि काँग्रेसला कात्रजच्या घाटात पकडण्याची व्यूहरचना आहे. सिडकोकडील एफएसआय, प्रकल्पग्रस्तांची घरे कायम, झोपडय़ांचे पुनर्वसन तसेच माथाडी कामगारांच्या घरांचा प्रश्न मुख्यमंत्र्यांकडे प्रलंबित आहे.
प्रकल्पग्रस्तांना रिक्षा परवाने विनाविलंब देण्यात यावेत, विद्युत वितरण कंपनीने वीजपुरवठा सुरक्षित आणि सुरळीत करावा यासारखे विषय घेऊनदेखील राष्ट्रवादीने लोकांच्या कामांना प्राधान्य देण्यास सुरुवात केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 30, 2014 3:09 am

Web Title: ncp on the road for raising people questions
Next Stories
1 जीटीआय बडतर्फ कामगार दोन वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत
2 नेरुळमध्ये चोरटय़ांचे थैमान
3 उरण-पनवेल महिला स्पेशल एसटी बस सेवा पुन्हा सुरू होणार
Just Now!
X