महानगरपालिका निवडणुकीचे चित्र उद्या (शुक्रवार) स्पष्ट होईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत उद्याच संपत असल्याने त्यानंतर सर्व लढती स्पष्ट होतील. दरम्यान, ऐनवेळी राष्ट्रवादीत कोलांटउडी मारलेले शिवसेनेचे बाळासाहेब बोराटे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. त्यांच्या रूपाने राष्ट्रवादीने मनपातील खाते उघडून जोरदार सलामी दिली. गुरुवारी १३ जणांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली.
मनपा निवडणूक प्रक्रियेतील पहिला टप्पा उद्या संपेल. बुधवारी उमेदवारी अर्जाची छाननी झाल्यानंतर गुरुवारपासून अर्ज मागे घेण्यास सुरुवात झाली. माघारीची मुदत संपल्यानंतर लढती स्पष्ट होऊन प्रचारात खऱ्या अर्थाने प्रचाराची रंगत सुरू होईल. प्रभाग क्रमांक २३ अ मधून माजी महापौर तथा राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संग्राम जगताप व अपक्ष अनिल बोरुडे यांनी गुरुवारी त्यांचे उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने बोराटे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली. आज उमेदवारी अर्ज मागे घेतलेल्यांमध्ये महापौर शीला शिंदे (प्रभाग २७ ब), माजी महापौर भगवान फुलसौंदर (प्रभाग ३० ब, दोघेही शिवसेना) यांच्यासह अन्य ११ जणांचा समावेश आहे. शिंदे यांच्याऐवजी त्यांचे पती अनिल शिंदे व फुलसौंदर यांच्याऐवजी त्यांच्या पत्नी सुनीता निवडणूक रिंगणात आहेत.
विविध कारणांनी बेजार झालेली सत्ताधारी भारतीय जनता पक्ष-शिवसेना युती, सत्तेसाठी आतूर झालेली काँग्रेस आघाडी आणि अस्तित्व निर्माण करण्याच्या प्रयत्नात असलेली मनसे अशी प्रामुख्याने तिरंगी लढत रंगणार आहे. सत्ताधारी युतीच्या सहा जागा रिक्त असून पाच ते सहा प्रभागांत त्यांना बंडखोरीचा धोका आहे. या दोन्ही गोष्टींचा विचार करता त्यांच्या दहा ते बारा जागा सध्या वजाबाकीत असून, हा गाळा भरून काढण्यासाठी उर्वरित ५५ ते ६० जागांवरच त्यांचे भवितव्य अवलंबून आहेत. मिलिंद गंधे, नरेंद्र कुलकर्णी, संजय चोपडा, शिवसेनेचे सचिन जाधव अशा जागांवर युतीला बंडखोरीचा धोका आहे. याशिवाय अन्य काही प्रभागांतही असंतुष्टांची संख्या मोठी आहे.
तुलनेने काँग्रेस आघाडी निश्चिंत आहे. त्यांना बंडखोरीची फारशी चिंता नाही. प्रभाग क्रमांक २३ मध्ये शिवसेनेचे उमेदवार बाळासाहेब बोराटे यांनी ऐनवेळी राष्ट्रवादीत कोलांटउडी मारून ही जागा बिनविरोध केली आहेच. त्याद्वारे राष्ट्रवादीनेच मनपात खाते उघडले. मात्र आणखी चार ते पाच जागा बिनविरोध करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे असे सांगितले जाते. त्यादृष्टीने व्यूहरचना सुरू असून त्याला कितपत यश येते हे उद्याच स्पष्ट होईल. मात्र बोराटे यांचा पहिला धक्का सहन केल्यानंतर भाजप-शिवसेना युती त्यादृष्टीने सतर्क झाली असून, ज्या ठिकाणी अशी शक्यता वाटते तेथील उमेदवारांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. अर्ज मागे घेण्यासाठी येणारा संभाव्य दबाव लक्षात घेऊन काही ठिकाणचे अपक्ष उमेदवार अज्ञातस्थळी रवानाही झाले आहेत. या सर्व गोष्टी उद्या स्पष्ट होतील.