* ५० विनामूल्य बसेसचा प्रस्ताव फेटाळला
* ठोस कारणे नाहीत..चर्चाही नाही ’ नकारघंटेला संशयाची किनार
बसथांब्यांवरील जाहिरातींच्या मोबदल्यात नव्याकोऱ्या ५० वातानुकूलित बसेस त्याही वार्षिक देखभाल-दुरुस्तीसह पदरात पडत असतील तर कोणताही सार्वजनिक परिवहन ऊपक्रम अशा ‘ऑफर’वर  तुटून पडेल. नवी मुंबई महापालिका परिवहन समितीतील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्यांनी मात्र ५० वातानुकूलित बसेसचा अशाच स्वरूपाचा एक प्रस्ताव कोणत्याही ठोस चर्चेशिवाय फेटाळून लावल्याने महापालिका वर्तुळात अनेकांच्या भुवया सध्या उंचावल्या आहेत. एनएमएमटीमार्फत चालविल्या जाणाऱ्या वातानुकूलित बससेवेला प्रवाशांचा तुफान असा प्रतिसाद मिळत असून नव्या बसेसमुळे या सेवेचा आणखी विस्तार करणे शक्य झाले असते. मात्र हा प्रस्ताव फेटाळताना सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी पुढे केलेली काही कारणेही हास्यास्पद ठरू लागल्याने सत्ताधाऱ्यांच्या या नकारघंटेमागील नेमके कारण काय, असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे.
गुजरात राज्यातील सुरत येथील मेसर्स महिंद्रा ट्रॅव्हल्स कंपनीने ५० वातानुकूलित बसेस मोफत घ्या, त्या बदल्यात बसथांब्यांवरील जाहिरातींचा हक्क द्या, अशा स्वरूपाचा प्रस्ताव नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमापुढे ठेवला होता. एनएमएमटीच्या ताफ्यात सध्या व्हॉल्वो कंपनीच्या ३० वातानुकूलित बसेस आहेत. व्हॉल्वो किंवा मर्सिझीड कंपनीच्या ५० बसेसच्या खरेदीसाठी ४५ कोटी, तर टाटा किंवा अशोक लेलॅण्ड कंपनीच्या वातानुकूलित बसेससाठी ३० कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. नव्या बस खरेदीचा प्रस्ताव सध्या विचाराधीन असला तरी अशा या मोठय़ा खर्चामुळे तो मागे पडला आहे. असे असताना मेसर्स मिहद्रा ट्रॅव्हल कंपनीने ‘युरल’ कंपनीच्या ५० बसेसचा प्रस्ताव एनएमएमटीपुढे ठेवला होता. युरल ही कंपनी बस उत्पादन क्षेत्रात नव्यानेच दाखल झाली आहे. या कंपनीच्या एक वातानुकूलित बसची किंमत ६० ते ९० लाख रुपयांच्या घरात जाते. नवी मुंबईतील वेगवेगळ्या उपनगरांमधील ५० बसथांबे तसेच या ५० बसेसवरील १० वर्षांच्या जाहिरातींच्या मोबदल्यात युरल कंपनीची ६० लाख रुपयांची एक, अशा ५० बसेस विनामूल्य देण्याचा प्रस्ताव महिंद्रा कंपनीने एनएमएमटीपुढे ठेवला होता. मात्र या कंपनीच्या बसेस दर्जाहीन आहेत, असा ठपका ठेवत परिवहन समितीमधील सत्ताधारी राष्ट्रवादीच्या सदस्यांनी हा प्रस्ताव फेटाळून लावल्याने सर्वानाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
नकारघंटेमागील फुटकळ कारणे
व्हॉल्वो, अशोक लेलॅण्ड अशा प्रथितयश कंपन्यांना स्पर्धा निर्माण करणाऱ्या ‘युरल’ कंपनीच्या एका वातानुकूलित बसची किंमत सुमारे ६० लाख एवढी आहे. असे असताना या बसेस दर्जाहीन ठरविताना सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी कोणते निकष लावले, असा सवाल आता महापालिका वर्तुळात उपस्थित केला जात आहे. एनएमएमटीतील अभियांत्रिकी विभागानेही या बसेस दर्जाहीन आहेत, अशा स्वरूपाचा कोणताही अहवाल सादर केलेला नाही. महत्त्वाचे म्हणजे या बसेस नादुरुस्त झाल्या तरी त्याची देखभाल दुरुस्ती संबंधित कंपनीमार्फत केली जाणार होती. या बसेसच्या माध्यमातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा १०० टक्के वाटा एनएमएमटीचा असणार होता. सहा महिन्यांच्या कालावधीत तीन टप्प्यांत या बसेस पुरविण्याचे निश्चित करण्यात आले होते.
बसथांब्यांच्या जाहिराती बेताच्याच
सध्याच्या घडीस एनएमएमटीच्या बसथांब्यावरील जाहिरातीचे कंत्राट रोनक अ‍ॅडव्हर्टायझिग कंपनीस देण्यात आले आहे. शहरातील काही मोक्याचे थांबे वगळता बहुतांश थांब्यावर परिवहन सदस्यांच्या तसेच राष्ट्रवादीच्या नेतेमंडळींची छायाचित्रं झळकत असतात. त्यामुळे यापैकी काही बसथांबे वर्षांनुवर्षे तोटय़ात चालल्याचे दिसून येते. या जाहिरातींचे हक्क महिंद्रा कंपनीस दिले असते तर परिवहन उपक्रमाच्या अहवालानुसार दहा वर्षांत त्यांना ३० कोटींचे उत्पन्न मिळाले असते. महिंद्रा कंपनीस या माध्यमातून फारसा नफा मिळणार नसला तरी बस उत्पादन क्षेत्रात नव्यानेच दाखल झालेल्या युरल कंपनीस आपल्या  उत्पादनाची जाहिरात आणि स्पर्धात्मक दर्जा सिद्ध करणे शक्य होणार होते. त्यामुळेच या कंपनीने हा प्रस्ताव एनएमएमटीपुढे ठेवला होता. विशेष म्हणजे, हा प्रस्ताव एनएमएमटीसाठी फारसा नकारात्मकही नव्हता. असे असताना या प्रस्तावाला लाल बावटा दाखविण्यामागील नेमके कारण मात्र सत्ताधाऱ्यांना स्पष्ट करता आलेले नाही.
यासंबंधी एनएमएमटीचे सभापती रामचंद्र सूर्यवंशी यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी युरल कंपनीच्या बसेस दर्जेदार नाहीत, असा दावा केला. या बसेस दोन महिन्यांत खिळखिळ्या झाल्या असत्या.  तसेच हा प्रस्ताव उपक्रमासाठी फारसा फायदेशीर नव्हता. यापेक्षा अधिक फायद्याचा प्रस्ताव मिळविण्यासाठी आमचे नेते प्रयत्नशील आहेत, असा दावाही सूर्यवंशी यांनी केला. दरम्यान या कंपनीच्या बसेस दर्जाहीन आहेत, अशा स्वरूपाची कोणतीही माहिती आमच्याकडे नाही, अशी माहिती एनएमएमटीचे व्यवस्थापक मांगळे यांनी दिली.