मुस्लिम मुजावर जातीचे खोटे ओबीसी प्रमाणपत्र दाखल करून सोलापूर महापालिकेची निवडणूक लढविल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नगरसेविका बिस्मिल्ला शिकलगर यांना पालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी अखेर अपात्र ठरविले आहे. दरम्यान, आयुक्तांच्या या निर्णयाच्या विरोधात आपण उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे शिकलगर यांनी सांगितले.
फेब्रुवारी २०१२ मध्ये झालेल्या सोलापूर महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नगरसेविका बिस्मिल्ला शिकलगर प्रभाग क्र. ३५अ (ओबीसी महिला राखीव) येथून निवडून आल्या होत्या. उमेदवारीअर्ज दाखल करताना त्यांनी मुजावर जातीचे ओबीसी प्रमाणपत्र जोडले होते. परंतु या प्रमाणपत्राबद्दल हरकत घेण्यात आल्यानंतर विभागीय जातपडताळणी समितीने त्यांचे जातप्रमाणपत्र अवैध ठरविले. त्यानुसार पालिका आयुक्त गुडेवार यांनी शिकलगर यांचे नगरसेवकपद रद्दबातल केले.
ओबीसी प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे महापालिकेतील भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक जगदीश पाटील व काँग्रेसचे नागेश ताकमोगे यांचे नगरसेवकपद धोक्यात आले आहे. हे दोघांनी उच्च न्यायालयात धाव घेतल्यामुळे त्यांच्यावरील कारवाई प्रलंबित आहे.