सत्ताधाऱ्यांचे लक्ष फक्त महापालिकेतील टेंडरवर आहे. मोठमोठय़ा प्रकल्पाची तर सोडा, पण गटार आणि शौचालयापर्यंतची कामेही सोडत नाही. घरातच सर्व सत्तापदे ठेवणाऱ्या नाईक कुटुंबीयांना जनता आणि कार्यकर्ते कंटाळले असून नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेला काँग्रेस पक्षाबरोबरच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी खुलेआम मदत केल्याचा गौप्यस्फोट शिवसेनेचे आमदार तथा ठाणे जिल्हा शिवसेनाप्रमुख एकनाथ शिंदे यांनी केला. येत्या विधानसभा निवडणुकीत पालकमंत्री गणेश नाईक आणि कुंटुबीयांना दे धक्का देणार असल्याचे नवी मुंबईतील अनेक नगरसेवक बोलत असून या नगरसेवकांनी मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली असल्याची खळबळजनक माहिती शिंदे यावेळी उघड केली आहे.
वाशी येथील विष्णुदास भावे नाटय़गृहात शिवसेनेच्या वतीने भगवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना शिंदे बोलत होते. बेलापूर येथील रेतीबंदरवर असलेला काचेचा बंगला तुटल्यानंतर पालकमंत्र्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे होता. पण त्यांनी कामातील टक्केवारीमध्ये धन्यता मानल्याची बोचरी टीका त्यांनी केली.
यावेळी विधानसभा निवडणुकीला सज्ज होण्याचे आवाहन शिंदे यांनी शिवसैनिकांना केले. तसेच गाफील राहू नका असे कान टोचत मतदारांपर्यंत पोहोचण्याचे सल्लाही त्यांनी दिला. महानगरपालिकने ऐरोलीमधील गणेश मंदिरामधील शेडवर मंत्र्याच्या दबावामुळे कारवाई करण्याची नोटीस बजावली आहे. या पाश्र्वभूमीवर जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांनी, भंगारमाफिया मुक्तार अन्सारी बिनदिक्कतपणे दिघ्यात अनधिकृतपणे झोपडय़ा उभारत आहे. मात्र पालकमंत्र्याना सदरचे बांधकाम दिसत नसल्याचा आरोप केला आहे. गणेश मंदिरावर कारवाई झाली तर नवी मुंबई बंद ठेवण्याचा इशारा चौगुले यांनी दिला आहे.