जिल्ह्यात अनेक वर्षांनंतर मृगाचा पाऊस समाधानकारक पडल्याने जवळपास साठ टक्के पेरण्या आटोपल्या आहेत. उर्वरित पेरण्याही आठवडाभरात पूर्णत्वास जाण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, गतवर्षीच्या तुलनेत यंदा कापसाच्या पेरणीचा टक्का घसरला असला तरी पेरणी झालेल्या एकूण क्षेत्रापैकी अध्र्या क्षेत्रावर कापसाचीच पेरणी करण्यात आली आहे.
जळगाव जिल्ह्यात यावेळी मृगाचा पाऊस चांगला झाल्याने पेरण्याही वेळेवर सुरू झाल्या आहेत. सात लाख ६५ हजार हेक्टर क्षेत्रापैकी सुमारे पाच लाख हेक्टर क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्याचे कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले. गतवर्षी सुमारे पाच लाख हेक्टर क्षेत्रावर कापसाची पेरणी करण्यात आली होती. या वर्षी कापसाच्या पेरणीकडे शेतकऱ्यांनी अधिक लक्ष दिलेले नसले तरी झालेल्या पेरण्यांपैकी निम्म्या क्षेत्रात कापसालाच प्राधान्य देण्यात आले आहे. यावेळी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ज्वारी व मका मोठय़ा प्रमाणात पेरला आहे. कृषी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आत्तापर्यंत दोन लाख दहा हजार हेक्टर क्षेत्रावर कापूस तर त्या खालोखाल ५६ हजार हेक्टरवर मका आणि ४३ हजार हेक्टर क्षेत्रावर ज्वारीचा पेरा करण्यात आला आहे. त्यानंतर उडीद, मुग, सोयाबीन, तीळ, तूर आदी पिकांची पेरणी करण्यात आली आहे. शासनाकडून यावेळी बियाण्यांसह खतांचाही पुरवठा मुबलक आणि वेळेवर झाला असल्याने टंचाई भासणार नाही असे कृषी विभागाने म्हटले आहे.