मुंबई विद्यापीठाच्या कारभाराबाबत बरे बोलावे, असे फारसे काही नाही. प्रवेश घेताना विद्यार्थ्यांना ज्या दिव्यातून जावे लागते त्यावरून विद्यापीठाची कार्यक्षमता (?) सहज लक्षात येते. वास्तविक विद्यापीठात गरज ६०० कर्मचाऱ्यांची असताना भरती मात्र तब्बल ३००० जणांची करण्यात आली आहे. या पाश्र्वभूमीवर कोणता कर्मचारी नेमके काय काम करतो याची झाडाझडती आता घेतली जाणार आहे. विद्यापीठातील सर्व तीन हजार कर्मचाऱ्यांना आपण केलेल्या (आणि न केलेल्याही) कामाचा लेखाजोखा आता सादर करावा लागणार आहे. विद्यापीठातील कर्मचाऱ्यांच्या कामाचे ऑडिट होण्याची ही पहिलीच वेळ आहे. कुलगुरू डॉ. विजय खोले यांच्या काळापासून अधिसभेत मागणी होत आली आहे. त्यानुसार ही समिती स्थापण्यात आली आहे. विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. नरेशचंद्र हे या समितीचे समन्वयक असून सदस्य म्हणून प्राचार्य डॉ. सिद्धेश्वर गडदे, डॉ. दिनेश पंजवानी, दिलीप करंडे आणि पदसिद्ध सदस्य कुलसचिव कुमार खैरे यांचा समावेश आहे. समितीने नुकतीच बैठक घेऊन सुरवातीला कर्मचाऱ्यांच्या कामाचे ऑडिट करायचे ठरविले आहे. त्यानुसार प्रत्येक विभागातील कनिष्ठ लिपीक, वरिष्ठ लिपीक, हेडक्लार्क, अधिक्षक, सहाय्यक निबंधक, उपनिबंधक आदी कर्मचाऱ्यांना दिवसभर केलेल्या कामाची माहिती ठराविक पद्धतीने लिहून द्यावी लागेल. ही माहिती कर्मचाऱ्यांना ई-मेलद्वारे कुलगुरू, प्र-कुलगुरू आणि कुलसचिव यांना पाठवायची आहे. या माहितीच्या आधारे कर्मचाऱ्यांच्या कामाचे नियोजन केले जाईल. ज्या ठिकाणी कामाचा कमी बोजा आहे त्या ठिकाणचे कर्मचारी हलवून जिथे त्यांची गरज आहे तिथे त्यांना पाठविले जाईल.
* समितीची नियुक्ती
कायमस्वरूपी आणि कंत्राटी तत्त्वावरील प्रत्येक कर्मचाऱ्याच्या कामाची झाडाझडती घेण्यासाठी विद्यापीठाने एका समिती नेमली असून कर्मचाऱ्यांना दर दिवशी केलेल्या कामाचे ऑडिट या समितीला सादर करावे लागणार आहे. विद्यापीठात ५७ वेगवेगळे विषय विभाग आहेत. या शिवाय परीक्षा विभाग, संलग्नता विभाग, आयडॉल, बहि:शाल शिक्षण केंद्र, विद्यार्थी कल्याण विभाग असा विद्यापीठाचा मोठा पसारा फोर्ट आणि कलिना संकुलात पसरला आहे. या विभागांना ही समिती भेट देऊन प्रत्येक कर्मचाऱ्याच्या कामाचा आढावा घेईल.

* विद्यार्थ्यांना ताटकळत ठेवण्याच्या वृत्तीला आळा
‘या ऑडिटचा कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर सकारात्मक परिणाम होईल. ज्या ठिकाणी कर्मचाऱ्यांचा विद्यार्थ्यांशी थेट संबंध येतो, त्या ठिकाणी तर तो नक्कीच दिसून येईल. विद्यार्थ्यांना ताटकळत ठेवण्याच्या कर्मचाऱ्यांच्या वृत्तीला यामुळे आळा बसेल,’ अशी आशा समितीचे सदस्य दिलीप करंडे यांनी व्यक्त केली.

* ६०० कर्मचारी पुरेसे?
विद्यापीठाच्या फोर्ट आणि कलिना संकुलात मिळून तब्बल तीन हजार कर्मचारी कायम वा कंत्राटी तत्त्वावर काम करीत आहेत. ऑडिटनंतर कर्मचाऱ्यांच्या कामाचे योग्य मॅन्युअल तयार झाल्यानंतर ही संख्या ६०० वर आणता येईल, असे विद्यापीठातील उच्चपदस्थांचे म्हणणे आहे. तंत्रज्ञानाची मदत घेऊन हे करता येणे शक्य आहे. पण, एकिकडे विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांच्या संख्येत दरवर्षी भर पडते आहे. विद्यापीठाचा हा वाढता व्याप सांभाळण्यासाठी कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्याची मागणी होते आहे. पण, त्यात कर्मचारी संख्या तब्बल पाचपट कमी करून विद्यापीठाचा डोलारा कसा सांभाळायचा असा प्रश्न आहे. परीक्षेच्या काळात परीक्षा विभागातील अपुऱ्या कर्मचाऱ्यांचा प्रश्न तर नेहमीच डोके वर काढीत असतो. त्यात आहे ते कर्मचारी कमी करण्याची कल्पना कितपत व्यवहार्य ठरेल असा प्रश्न आहे.